वैजापूर तालुक्यात गारपिटीमुळे जवळपास १४ गावांतील दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

वैजापूर ,​२०​ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी व गंगथडी भागातील काही गावांमध्ये शुक्रवारी व शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह तुफान गारपीट झाली. या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या गहू, मका, हरभरा,बाजरी या पिकांसह फळबागांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

गेली चार-पाच दिवस तालुक्यात ढगाळ वातावरण होते. काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारपिटीसह झालेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या रविवारी व सोमवारी तालुक्यातील बहुतांश मंडळात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तालुक्यातील पारळा, निमगांव,पेंडेफळ,सावखेडगंगा,गोंदगांव आदी 14 गावांतील सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.दरम्यान तहसीलदार राहुल गायकवाड व कृषी अधिकारी एच.आर.बोयनर यांनी गारपीट झालेल्या गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.