वैजापूर सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे-शिंदे गटाचे पॅनल ; निवडणूक चुरशीची होणार

वैजापूर,१९ऑक्टोबर /प्रतिनिधी :-येत्या 13 नोव्हेंबरला वैजापूर तालुका विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणुक होत असून या निवडणुकीत शिंदे व ठाकरे गटाच्या पॅनेलमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

वैजापूर सोसायटीच्या 13 जागांसाठी आतापर्यंत एकूण 40 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 31 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून 13 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. मतदार संख्या 999 आहे.

वैजापूर सोसायटीच्या या निवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे गटातर्फे मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी यांनी स्व.आर.एम. वाणी विकास मंच या नावाने पॅनल तयार केले आहे तर शिंदे गटातर्फे माजी नगरसेवक तथा शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके यांचे पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असून त्यादृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

शिंदे आणि ठाकरे गटातर्फे जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून आ. रमेश पाटील बोरणारे हे शिंदे गटाचे असून ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.