‘मशाल’ ठाकरे गटाचीच, समता पक्षाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली ,१९ ऑक्टोबर/प्रतिनिधी :-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पक्षाने केलेला दावा दिल्ली हायकोर्टाने बुधवारी फेटाळून लावला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. समता पक्षाने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह काढून घेण्याची मागणी केली होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या ‘धगधगती मशाल’ चिन्हावर जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीनेही दावा केला होता. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पक्षाने निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणाही पक्षाने केली होती. समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला होता. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने समता पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेले ‘मशाल’ हे चिन्ह अंतरिम स्वरूपाचे आहे. अंधेरी पोटनिवडणुकीनंतर त्याच्या पुनर्वाटपाबाबत विचार केला जाऊ शकतो असे उत्तर दिले होते, मात्र या उत्तरावर समाधान न झाल्याने समता पक्षाने निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.

समता पक्षाचे वकील ॲड. कमलेशकुमार मिश्रा यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, समता पक्षाने २०१४ ची लोकसभा निवडणूक मशाल या चिन्हावर लढवली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेला मशाल चिन्ह देण्यापूर्वी आमच्या पक्षाला कळवणे आवश्यक होते, असा युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाचे वकील अॅड. सिद्धांत कुमार यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना सांगितले की, ‘‘समता पक्षाची मान्यता २००४ सालीच रद्द करण्यात आली आहे. स्वाभाविकपणे त्यांचे चिन्ह गोठवण्यात आले आहे. त्यामुळे मशाल या चिन्हावर समता पक्षाने हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय हे चिन्ह अन्य कोणत्या पक्षाला देताना समता पक्षाला कळवण्याचाही प्रश्न येत नाही.’’

यावर न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी, ‘‘याचिकाकर्त्या पक्षाची मान्यता २००४ सालीच रद्द झाली आहे. त्यामुळे त्यांना मशाल या चिन्हावर हक्क सांगण्याचा कोणताही अधिकार नाही.’’ असे स्पष्ट करत समता पक्षाची याचिका फेटाळून लावली.

समता पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार

दरम्यान, समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी मशाल चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचाही इशारा यापूर्वी दिला आहे. आता दिल्ली हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर समता पक्ष पुढे काय पाऊल उचलणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.