जेईई (मुख्य) परीक्षा-2021 चे चार सत्रांमध्ये (फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे) आयोजन करण्यात येणार

जेईई (मुख्य) परीक्षा-2021, ही 13 भाषांमध्ये होणार

नवी दिल्ली ,दि. १६ डिसेंबर : केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी आज जेईई (मुख्य) परीक्षा-2021 संबंधी अनेक बाबी जाहीर केल्या. जेईई (मुख्य) परीक्षा-2021 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 2021 अशा चार सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जेईई (मुख्य) परीक्षा 2021 चे पहिले सत्र 23–26 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अनुषंगाने प्रथमच जेईई (मुख्य) परीक्षा-2021 ही मराठी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा 13 भाषांमध्ये होणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले.

मंत्र्यांनी सांगितले की, उमेदवारांना चारही सत्रांमध्ये उपस्थिती दर्शवण्याची आवश्यकता नाही. तथापी, उमेदवार एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये उपस्थित असेल तर त्याचे/तिचे बेस्ट ऑफ 2021 एनटीए (NTA) गुण गुणवत्ता यादी/श्रेणीसाठी गृहीत धरले जातील. प्रश्नपत्रिका एकूण 90 गुणांची असेल, त्यापैकी उमेदवारांना 75 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे सांगताना मंत्री म्हणाले, जेईई (मुख्य) परीक्षा-2021 चे चार सत्रांत आयोजन केल्यामुळे उमेदवारांना एका प्रयत्नात चांगले गुण मिळवता आले नाहीत तर आपले गुण सुधारण्याची चार सत्रांमधून बहुविध संधी मिळेल. ते पुढे म्हणाले, जर या विशिष्ट कालावधीत बोर्ड परीक्षा असेल किंवा कोविड-19 परिस्थिती असेल तर उमेदवाराला जेईई (मुख्य) परीक्षा-2021 पुढील महिन्यात देण्याची संधी मिळेल.