तोतया अप्पर जिल्हाधिकाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

छत्रपती संभाजीनगर,११  एप्रिल / प्रतिनिधी :-  वन आणि आरोग्य विभागात नोकरी लावण्याचा आमिषाने छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली, यवतमाळ व इतर जिल्ह्यात अनेकांना कोट्यवधींना फसवणारा तोतया अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल पजई-मराठे व त्याचा सहकारी अनंत कलोरे यांचे जामीन अर्ज प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी रामटेके यांनी फेटाळला. दोन्ही आरोपींविरुद्ध येथील जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

अमोल पजई-मराठे यांनी स्वतःला हिंगोली येथील अप्पर जिल्हाधिकारी असल्याचे दर्शविले. त्याच्याविरुद्ध प्रथमतः हिंगोली येथे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याखाली अमोल पजई व त्याचा साथीदार अनंत कलोरे यास अटक करण्यात आली होती. त्यांच्या प्रकरणांचा उलगडा होताच छत्रपती संभाजीनगर येथील अशोक विखे व इतरांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विखे यांना १४ लाख ८७ हजार तर इतरांना मिळून एकूण ५४ लाख ९७ हजार रुपयास फसवले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. फिर्यादींकडून ॲड. आनंद देशपांडे, ॲड. आदेश वटाणे, ॲड. शैलेश आडे यांनी काम पाहिले व अॅड प्रेमलता बनखेडे, अॅड. स्नेहल लिंगसे, अॅड. गोपाल खंदारे व प्राची चव्हाण यांनी सहकार्य केले. तर आरोपींतर्फे ॲड. गिरी यांनी युक्तिवाद केला.