किराडपुरा दंगल :आणखी ११ दंगेखोर पोलिस कोठडीत 

छत्रपती संभाजीनगर,२  एप्रिल / प्रतिनिधी :-  किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी १४ जणांच्‍या विशेष तपास पथकाने मुसक्या आवळल्या. त्‍यातील ११ जणांना ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे तर तिघांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर.व्‍ही. सपाटे यांनी रविवारी दि.२ एप्रिल रोजी दिले.

शेख अझहर शेख मझहर (२८, रा. रहेमानिया कॉलनी), शेख समीर शेख मुनीर (२३, रा. गल्ली क्रं.११, संजयनगर), शेख समीर शेख हसन (२२, रा. कटकट गेट), तालेब खान साजेद खान (२६, रा. किराडपुरा), सय्यद अलीम सय्यद शौकत (३२, रा. किराडपुरा), सोहेल खान कबीर खान (२४, रा. गल्ली क्रं. १९, बायजीपुरा), सय्यद सद्दाम सय्यद जकी (२३, रा. यासीन नगर, हर्सुल), शेख मोहसिन शेख जाफर (३३, रा. गल्‍ली क्रं.३४, बायजीपुरा), शेख असद शेख अश्‍पाक (२१, रा. नेहरुनगर), शेख रियाज शेख जहुर (३५, रा. गल्ली क्रं.९, बायजीपुरा) आणि सय्यद शोएब सय्यद शफिक (३८, रा. रहेमानिया कॉलनी) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.

तर सय्यद बाबर सय्यद कफिलोद्दीन (३०, रा. किराडपुरा), मोहम्मद इलीयास ऊर्फ इल्ली जहुर (३६, रा. चमचम नगर, नारेगाव) आणि मोहम्मद नासेर ऊर्फ इन्‍ता मोहम्मद फारुक (३१, रा. नुर कॉलनी, भडकल गेट) या आरोपींची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे.

गुन्‍हा हा गंभीर स्‍वरुपाचा आहे. आरोपींचे आणखी कोण सा‍थीदार आहेत याबाबत आरोपींकडे चौकशी करायची आहे. गुन्‍ह्यात वापरलेले लाठ्या-काठ्या, सळ्या हस्‍तगत करायचे आहेत. त्‍याचप्रमाणे गुन्‍हा करण्‍यामागे आरोपींचा नेमका हेतु काय होता याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्‍याची विनंती जिन्‍सी पोलिस ठाण्‍याचे सहायक निरीक्षक ए.बी. मगरे यांनी न्‍यायालयाकडे केली होती. त्‍यानंतर न्‍यायालयाने  आदेश दिले.

छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात तरुणांच्या दोन गटात गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर जाळपोळ, दगडफेक आणि हाणामारीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार, अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता. या दंगलीनंतर  पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत श्रीराम नवमीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडला होता. या  प्रकरणात जिन्‍सी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.