धाराशिव नामांतराच्या विरोधात दोन याचिका :सुनावणी २० एप्रिलला 

छत्रपती संभाजीनगर,२  एप्रिल / प्रतिनिधी :-  उस्मानाबादचे नाव ‘धारासूर’या राक्षसाच्या नावावरुन ‘धाराशिव’ करण्याच्या विरोधात दोन नवीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. त्यावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय  व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. व्ही. मारणे यांनी सुनावणी घेतली. मात्र, काही याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी ठेवली आहे.

या प्रकरणी अलीमोद्दीन शेख, सय्यद रफीक, ॲड. काझी परवेझ, ॲड. जावेद काझी, शेख माजीद, शेख जाफर, पठाण जमीर, काझी मुजम्मील तसेच फिजा काझी आणि ॲड. तौफीक कमाल (सर्व रा. धाराशिव) यांनी ॲड. सईद एस. शेख यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत. केवळ धर्मांध लोकांच्या मागणीवरून उस्मानाबादचे नाव धारासूर राक्षसाच्या नावावर धाराशिव असे बेकायदेशीररित्या करण्यात येत आहे. यासाठी आधार म्हणून निजाम राजवट व मीर उस्मान यांच्यावर ऐतिहासिक तथ्याविना जुलमी राजवटीचा आरोप करण्यात येतो. मात्र निजाम राजवट ही सर्वधर्मसमभाव जपणारी होती. निजामाचे प्रधानमंत्री, मंत्री, अधिकारी वर्ग हिंदू होते. इतिहासात नमूद असल्याप्रमाणे मीर उस्मान यांनी देशातील मंदिरांना जागीर व इनामे दिली आहेत. हैदराबाद येथील सीताराम बाघ मंदिर, किशनबाघ मंदिर, झामसिंग मंदिर, यदगिरीगुट्टा मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, जालन्याचे नागनाथ मंदिर, पैठणचे एकनाथ मंदिर, नांदेडचे अनंतगिरी आणि बालाजी मंदिर आदी मंदिरांचा त्यात समावेश आहे, असे याचिकेत म्हटले आहे. निजामशाहीत उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली. ज्यामध्ये जुनी नगरपालिका इमारत, भूमिगत पाण्याची पाईपलाईन, विहिरी, सामान्य रुग्णालय, पशु रुग्णालय, युनानी रुग्णालय, जुनी जिल्हाधिकारी इमारत, जुनी मुन्सिफ इमारत, तहसील इमारत, मल्टिपर्पज शाळा, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा कारागृह, जुने रस्ते आणि पूल अशी विविध कामे आहेत. याउलट जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांनी नामांतरासाठी शासनास दिलेल्या अहवालात नमूद केले आहे की, स्कंद पुराणाच्या कथेनुसार धारासूर नावाचा राक्षस जन्मास आला म्हणून या शहराचे नाव धाराशिव आहे. त्याने जनतेचा छळ केला म्हणून सरस्वती देवीने अवतार घेऊन धारासूर राक्षसाचा वध केला, अशी दंतकथा आहे.

निजाम राजवट किंवा मीर उस्मान धर्मांध नव्हते. दख्खन भागात हिंदुबहुल राजा व प्रजेला सोबत घेऊन उस्मान यांनी ३७ वर्षे तर निजाम राजवटीने अविरतपणे २०० वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केले. मीर उस्मान यांनी चीन युध्दावेळी देश संकटात असताना भारत सरकारला पाच टन सोने व कोट्यवधी रुपयांची मदत केली होती. त्यामुळे नामातर करुन धर्मांध लोक इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

दरम्यान, नवीन याचिकांवर सोमवारी (२७ मार्च) रोजी झालेल्या सुनावणीत ॲड. सईद शेख यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. मात्र, पूर्वीचे याचिकाकर्ते खलील सय्यद व इतरांच्या वतीने आणखी वेळ मागून घेतल्याने न्यायालयाने २० एप्रिल रोजी अंतिम सुनावणी ठेवली आहे. शासनाच्या वतीने महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ व इतरांनी काम पाहिले.