दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणालाच नाही! दोघांची हायकोर्टात धाव :शुक्रवारी सुनावणी

दोन्ही गटाची परवानगी नाकारल्याने आता कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कोणाला परवानगी मिळणार याचा पेच कायम होता. अखेर महानगरपालिकेने शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. मुंबई महानगरपालिकेने दोन्ही गटांना एक पत्र दिले आहे. मुंबई महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला हायकोर्टात होणार आहे. आज शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार होती. मात्र शिंदे गटानेही याचिका दाखल केल्याने आता याप्रकरणी उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. महापालिका प्रशासनावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी देखील मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिवाजी पार्कवर मेळाव्याला शिंदे गटालाच परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात येत आहे.

शिवाजी पार्क दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून कोणालाच दिली जाणार नाही. शांतता आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन परवानगी नाकारली असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे.

मुंबई पालिकेने दोन्ही गटांना असे पाठवले पत्र

महोदय,

छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क, दादर येथे दसरा मेळावा आयोजित करण्याकरिता परवानगी मिळावी म्हणून आपला विनंती अर्ज या कार्यालयात प्राप्त झालेला आहे. तसेच मा. खा. अनिल देसाई यांचे सुध्दा छत्रपती श्री. शिवाजी महाराज पार्क, दादर येथे दसरा मेळावा आयोजित करण्याकरिता अर्ज कार्यालयात प्राप्त झालेले आहेत.

मला प्राप्त अधिकारांच्या अनुषंगाने एखाद्या मैदानाच्या सार्वजनिक वापरास परवानगी देणे पुर्वी पोलीस विभागाचे अभिप्राय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक आहेत. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, मुंबई यांचे क्र. जा.क्र.6438/2022 दि.21.09.2022 नुसार पोलीस विभागाचे अभिप्राय प्राप्त झालेले असून त्यात खालील प्रमाणे नमूद केलेले आहे.

दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळणेसाठी अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो

त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्याने मला उप आयुक्त, (परि.-2) या पदावरील प्राप्त अधिकारांचा वापर करुन दिनांक 05.10.2022 रोजी दसरा मेळावा साजरा करण्याकरिता प्राप्त झालेला आपला अर्ज नामंजुर करण्यात येत आहे.

दरम्यान, शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी देण्यात आली आहे. बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळून लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे बुधवारी गोरेगावमध्ये शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. त्यात उद्धव ठाकरे यांनी यंदाचा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार अशी घोषणा केली. तसेच, आज एवढी गर्दी तर दसरा मेळाव्याला किती गर्दी असेल, असे म्हणत दसऱ्याला गद्दारांची लक्तरे काढणार, असा इशाराही ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे. तर तिकडे शिंदे गटही दसऱ्याला शिवाजी पार्कच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा व्हावी, यासाठी आग्रही आहे.