पाणीपुरवठा याेजनेचा पाेरखेळ लावलाय: मजीप्राच्या  प्रकल्प अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश

 छत्रपती संभाजीनगर,३१ मार्च  / प्रतिनिधी :-  पैठणहून पाणी आणण्याच्या जलपुरवठा याेजनेच्या कामाची स्थिती पाहून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याेजनेचा पाेरखेळ लावलाय का, असा प्रश्न उपस्थित करून कंत्राटदार मालामाल आणि शहरवासीयांचे हाल, अशी परिस्थिती झाली असून प्रकल्प फसवणुकीकडे तर चालला नाही ना, अशी विचारणा खंडपीठाने केली. याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा याेजनेचे प्रकल्प प्रमुख अभिषेक कृष्णा यांनी स्वतः पुढील तारखेच्या सुनावणीवेळी हजर राहावे, असेही खंडपीठाने आदेश दिले आहेत. दरम्यान, येत्या ११ एप्रिल राेजी पुढील सुनावणी हाेणार असल्याची माहिती मजीप्राचे वकील विनाेद पाटील यांनी दिली.

खंडपीठात पाणीपुरवठा याेजनेच्या कामाची स्थिती मांडण्यात आली. सातपैकी तीन जलकुंभ ३१ मार्चपर्यंत पूर्ण करू, असे कंत्राटदार कंपनी जीव्हीपीव्हीआरकडून यापूर्वीच्या सुनावणीवेळी सांगण्यात आले हाेते. मात्र, आजच्या सुनावणीवेळी कंत्राटदाराच्या वतीने तीन जलकुंभ ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करू तर उर्वरीत जलकुंभ ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण हाेतील, असे सांगण्यात आले. कंत्राटदार कंपनीने अंतिम शपथपत्र सादर करावे, असेही खंडपीठाने सुनावले. जलवाहिनी टाकण्याचे काम ३८ किलाेमीटरपैकी केवळ १९ टक्केच काम झाले आहे. तर शहराअंतर्गत एक हजार ९११ किलाेमीटरपैकी केवळ १४ टक्केच जलवाहिनी टाकण्याचे काम झाले आहे. हायड्राे टेेस्टिंगचे काम १८ किमीपैकी १ टक्काही झालेले नाही, अशी माहिती खंडपीठापुढे सुनावणीवेळी देण्यात आल्यानंतर खंडपीठाने तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करून याेजनेच्या कामाचा पाेरखेळ लावल्याचे म्हटले. कंत्राटदाराचे केवळ ५३ काेटी आणि त्यातही ३० काेटी सरकारच्या कपातीसंदर्भातील असून अवघे २३ काेटीच देणे बाकी असल्याचेही खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याप्रकरणात न्यायालयीन मित्र म्हणून अॅड. सचिन देशमुख, मूळ याचिकाकर्ते अॅड. अमित मुखेडकर तर सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर आदींनी कामकाज पाहिले.