क्षुल्लक कारणावरुन खून केल्याप्रकरणी दोन सख्‍ख्‍या भावांसह मित्राला जन्‍मठेप

छत्रपती संभाजीनगर,१६ मार्च  / प्रतिनिधी :-  गाडी अंगावर घातल्याचा जाब विचारल्याच्‍या क्षुल्लक  कारणावरुन एका व्‍यक्तीला लाकडी दांड्याने मारहाण करुन खून केल्याप्रकरणी दोन सख्‍ख्‍या भावांसह मित्राला जन्‍मठेप आणि प्रत्‍येकी २० हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एम. कोचे यांनी गुरुवारी दि.१६ ठोठावली.

शेख सादीक ऊर्फ मुन्‍ना जान मोहम्मद (२८), जावेद शेख जान मोहम्मद (३२, दोघे रा. मठ मोहल्ला, अजिंठा ता. सिल्लोड) आणि अथर ऊर्फ अत्तु बेग जाफर (३८, रा. धोबी गल्ला, अजिंठा ता. सिल्लोड) अशी आरोपींची नावे आहेत.

विशेष म्हणजे गुन्‍ह्यात तिघा ​आरोपींपैकी एकाने वृध्‍दाला लाकडी दांड्याने मारहाण केली, मात्र गुन्‍ह्यात इतर दोघा आरोपींचाही तेवढाच सहभाग असल्याने ते देखील या खूनाला जबाबदार असल्याचे सहायक लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले. त्‍यानंतर न्‍यायालयाने तिघा आरोपींना शिक्षा ठोठावली.  

या प्रकरणात शेख मोहम्मद सौफीयान मोहम्मद शफियोद्दीन उमर (२३, रा. अजिंठा ता. सिल्लोड) याने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २६ ऑगस्‍ट २०२१ रोजी रात्री ८ वाजेच्‍या सुमारास फिर्यादीचे वडील तथा मयत मोहम्मद शफियोद्दीन (४५) हे गल्लीत उभे असताना आरोपी शेख सादीक ऊर्फ मुन्ना याने त्‍याचे ओमनी वाहन त्‍यांच्‍या अंगावर घालून, जखमी करण्‍याचा प्रयत्‍न केला. शफियोद्दीन यांनी याचा जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ करुन बाचाबाची सुरु केली. उपस्थित लोकांनी त्‍यांची भांडण सोडवली.

घटनेच्‍या २०-२५ मि​नि​टांनी  शफियोद्दीन हे भावासह गप्‍पा मारत उभे असताना, आरोपी शेख सादीक हा त्‍याचा भाऊ जावेद शेख आणि मीत्र अथर ऊर्फ अत्तु असे तेथे आले. जावेद शेख आणि अथर ऊर्फ अत्तु या दोघांनी शफियोद्दीन यांना शिवीगाळ सुरु केली. तर शेख सादीक याने हातातील लाकडी दांड्याने शफियोद्दीन यांच्‍या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. शफियोद्दीन यांना उपचारासाठी अजिंठा येथील सरकारी रुग्णालयात आणले असता त्‍यांचा मृत्‍यू झाला. प्रकरणात अजिंठा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

या प्रकरणात तपास अधिकारी अजित विसपुते यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीत सहायक लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्‍वये जन्‍मठेप आणि प्रत्‍येकी २० हजारांच्‍या दंडाची शिक्षा ठोठावली.या प्रकरणात अॅड. बांगर यांना अॅड. अभिमान करपे यांनी सहाय्य केले.