सकारात्मक पाहणे हेच खरे सुखी जीवनाचे रहस्य – डॉ. सचिन परब

वैजापूर ,१६ मार्च / प्रतिनिधी :- दुसऱ्याच्या सुखी, समाधानी व आनंदी जीवनाला सकारात्मकतेने पाहणे हेच खरे सुखी जीवनाचे रहस्य होय असे प्रतिपादन शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते मुंबईचे मनोविकार तज्ञ डॉ.सचिन परब यांनी बुधवारी (ता.15) येथे केले.

येथील सूरज लाँन्स मध्ये आयोजित प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विद्यालयद्वारे आयोजित “सुखी जीवन का रहस्य” या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मनुष्य आपल्या जीवनात सदैव नकारात्मक विचारांच्या गाठी निर्माण करीत असतो. मस्तिष्क मध्ये निर्माण झालेल्या या गाठी पुढे पुढे हृदयाच्या रक्त वाहिन्यात सरकत जातात व हृदय रोग, रक्तदाब, मधुमेह सारखे आजार शरीरात निर्माण होतात व दुःखी जगण्याला आरंभ होतो. यासाठी आपल्या मनातील नकारात्मकता समूळ काढून टाका, दुसऱ्याचे भले चिंता, मनातील तेढ, दुर्गुण, वाईटपणा यांचे समूळ उच्चटन करा,सुख तुमच्याकडे आपोआप धावत येईल असे डॉ. परब म्हणाले “ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधानी” परमेश्वराने जसे ठेवले तसेच रहाण, अधिकची लालसा न करणे हे ही सुखी जीवनाचे रहस्य आहे, असे ही डॉ. परब म्हणाले.

कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांनी केले. छत्रपती संभाजीनगरच्या प्रजापिता ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या प्रमुख बी.के. शीला दीदी, वैजापूर केंद्राच्या कमल दीदी, डॉ. व्ही.जी. शिंदे, संजय पाटील निकम, ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, अँड.आर.डी, थोट,अँड.प्रदीप चंदने, विष्णू जेजुरकर, प्रेमसिंह राजपूत, राजू जोगीलाल राजपूत, लिमेश वाणी, विजय शिनगर, कराळे भाई, जोगीलाल राजपूत, अशोक धसे, मुकुंद दाभाडे यांच्यासह ग्रामीण भागातील नागरिक व महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होते.