किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी तीन  आरोपींना पोलिस कोठडी 

छत्रपती संभाजीनगर,७  एप्रिल / प्रतिनिधी :- किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी तीन  आरोपींच्‍या विशेष तपास पथकाने मुसक्या आवळल्या. त्‍यांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एम.एम. माळी यांनी शुक्रवारी दि.७ एप्रिल रोजी दिले.

सलमान खान हारुण खान (२४, रा. गणेश कॉलनी), शेख फैजानशेख मेहराज (२०, रा. किराडपुरा)  आणि शेख सर्फराज शेख शफीक (रा. रहेमानिया कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.

गुन्‍हा हा गंभीर स्‍वरुपाचा आहे. अटक आरोपींकडून त्‍यांच्‍या साथीदारांची नाव निष्‍पन्‍न होत आहेत, आणखी नावे निष्‍पन्‍न होण्‍याची शक्यता आहे. गुन्‍ह्यात वापरलेले लाठ्या-काठ्या, सळ्या हस्‍तगत करायचे आहेत. त्‍याचप्रमाणे गुन्‍हा करण्‍यासाठी आरोपींना कोणी चिथावणी दिली होती का तसेच गुन्‍हा करण्‍यामागे आरोपींचा नेमका हेतु काय होता याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील शशिकांत ईघारे यांनी न्‍यायालयाकडे केली होती.

त्‍या आठ आरोपींना न्‍यायालयीन कोठडी

सय्यद शहेबाज सय्यद जिलानी (२४, रा. शरिफ कॉलनी, कटकट गेट), शेख कलीम शेख सलीम (२५, रा. नेहरुनगर, कटकट गेट), शेख सोहेल शेख खाजा (२०, रा. गल्ली क्रं. ४, किराडपुरा), आमेर सोहेल लतीफ खान (२४, रा. न्‍यु बायजीपुरा), अल खुतुब हबीब हमद (३०, रा. बायजीपुरा), हबीब हसन हबीब उमर (३६, रा. बायजीपुरा), राशेद दिप सालमीन दिप (२३, रा. इंदिरा नगर, बायजीपुरा), सोहेल खान अमजद खान (२१, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना ४ ते ५ एप्रिल दरम्यान पोलिसांनी अटक केली होती. तर न्‍यायलयाने त्‍यांना आजपर्यंत पोलिस कोठडीत ठोठावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्‍यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश न्‍यायलयाने दिले.