लाचखोर कनिष्ठ लिपिकासह कनिष्ठ अभियंत्याला पोलिस कोठडी 

छत्रपती संभाजीनगर,७  एप्रिल / प्रतिनिधी :-  आधार केंद्रासाठी तात्पुरत्या  स्वरुपात महापालिकेची शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यासाठी लाच मागून ती स्विकारणाऱ्या महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या कनिष्ठ लिपिकासह कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला शनिवारपर्यंत दि.८ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी शुक्रवारी दि.७ एप्रिल रोजी दिले.निखिल मुकुंद  गायकवाड (२९) असे कनिष्‍ठ लिपीक तर शेख मोईनुद्दीन शेख नईम (३०) असे कंत्राटी कनिष्‍ठ अभियंत्‍याचे नाव आहे.

सहायक लोकाभियोक्ता आर.सी. कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला की, आरोपी निखील गायकवाड याने कारवाई दरम्याने १५ हजार रुपये हे मॅडमचे असल्याचा उल्लेख केला, त्‍या मॅडम कोण याचा तपास करायचा आहे. आरोपींनी लाच कोणाच्‍या सांगण्‍यावरुन आणि कोणासाठी स्‍वीकारली आहे. सीसीटिव्‍ही चित्रण आणि इतर कागदपत्र हस्‍तगत करायचे आहेत. तसेच आरोपी शेख मोईनुद्दीन याने तक्रारदाराकडून अगोदर पाच हजार रुपये घेताले आहेत. याचा देखील तपास बाकी असल्याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले. सुनावणी अंती न्‍यायालयाने आरोपींना शनिवारपर्यंत  पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणी २६ वर्षीय तरुणाने एसीबीकडे धाव घेतली होती. त्यानुसार तक्रारदार तरुणाला आधार केंद्र सुरु करावयाचे होते. त्यासाठी त्याने तात्पूरत्या स्वरुपात महापालिकेची शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित लाचखोराकडे अर्ज केला होता. मात्र लाच मागितल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारीची शहानिशा करुन पडताळणी केली असता, २८ ते ३१ मार्च दरम्यान लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीने सापळा लावला असता, आरोपी निखिल याच्या सुचनेवरुन शेख याने तक्रारदाराला पंचासमक्ष १५ हजार रुपये लाचेची मागणी केली आणि दोघांनीही पंचासमक्ष पंधरा हजार रुपयांची लाच घेताना दोघांनाही एसीबीच्या पथकाने पकडले.या  प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.