२ महिन्यात जाणार नारायण राणेंचे मंत्रिपद; ठाकरे गटाच्या या नेत्याने केली भविष्यवाणी

मुंबई,१२ मार्च  /प्रतिनिधी :-केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सतत त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी, कोकणातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी, “नारायण राणेंचे मंत्रिपद येत्या २ महिन्यात जाणार” अशी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, नुकतेच वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली.

आमदार वैभव नाईक म्हणाले की, “आतापर्यंत इतरांचे राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या नारायण राणेंचे राजकीय अस्तित्व आता भाजप ठरवणार आहे. भाजपला आता नारायण राणे यांची राजकीयदृष्टया गरज नसल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार,” अशी भविष्यवाणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, “नितेश राणेंनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावे की, त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीचे काय झाले? वडिलांनी नेमका कोणता समझोता केला? हे अगोदर जनतेसमोर आणावे आणि मग इतरांना उपदेश करावा.”