राज्य सरकारकडे बहुमत नाही- देवेंद्र फडणवीस

राज्याच्या सत्तासंघर्षात भाजप आणि राज्यापालांची एन्ट्री  

औरंगाबाद ,२८ जून /प्रतिनिधी :-राज्याच्या सत्तासंघर्षात आता भाजप आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची एन्ट्री झाली आहे. भाजपकडून राज्यापालांना बहुमत चाचणीसाठी पत्र देण्यात आलं आहे.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना बहुमत चाचणीचं पत्र दिलं.

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तब्बल 45 मिनिंट चर्चा झाली. यानंतर देवेंद्र फडवणीस यांनी मीडियाशी बोलताना भेटीची माहिती दिली.

राज्यपालांना आज ईमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्याची आताची जी परिस्थिती आहे त्याचा उल्लेख केलेला आहे, शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत, काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आम्हाला रहायचं नाही अशी त्यांची तक्रार आहे. अशा या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

सरकार अल्पमतात असल्याने निर्णयात हस्तक्षेप करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे. याशिवाय बहुमत चाचणीची मागणी करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांच्या याचिकेची प्रत राज्यपालांकडे देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. राज्यपालांनी 30 तारखेला सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे, अशीही चर्चा आहे. यावेळीच बहुमत चाचणी घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.