आदिवासींना वनवासी बोलणे हा आदिवासींचा अपमान आहे – शरद पवार

चव्हाण सेंटरतर्फे  ट्रायबल वेल्फेअर सेंटर हा नवा विभाग सुरु

अझीम प्रेमजी यांनी चव्हाणसेंटरचा सन्मान स्वीकारल्याबद्दल आणि सन्मानाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल शरद पवारानी व्यक्त केली कृतज्ञता

मुंबई,१२ मार्च  /प्रतिनिधी :-आज या देशात आणि राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही ख-या अर्थाने जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अद्यापही पूर्णत्वाला गेली असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जल, जंगल आणि जमीन इथे ते खरे मालक आहेत असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. 

आज जंगल आणि त्यासंबंधीचा जो संघर्ष होतो. ज्याचा उल्लेख प्रतिभाताईनी आपल्या भाषणात केला. आज खरंच संघर्ष करण्यासाठी जे वरती येतात त्यांचा आदिवासींसंबधी त्यांचे ज्ञान आहे ते ज्ञान एकादृष्टीने अज्ञानच आहे अशाप्रकारची प्रचिती देतात असे स्पष्ट करतानाच आजही या देशातील, राज्यातील वनसंपत्ती जी राहिली ती आदिवासींनी सांभाळलेली आहे हा खरा त्यांचा अधिकार आहे. ते त्यांचे कर्तृत्व आहे असे शरद पवार यावेळी म्हणाले. 

त्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी त्यांचे अधिकार जतन करण्यासाठी जे लोक प्रयत्नांची परीक्षा आणि वेळ प्रसंगी संघर्ष करतात त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्‍या लोकांच्या मालिकेमध्ये प्रतिभा शिंदे आणि त्यांचे सहकारी व्यासपीठावर आहेत ते पाहून शरद पवार यांनी मनापासून समाधान व्यक्त केले.

या आदिवासींच्या हिताची जपणूक करण्यासाठी विशेष लक्ष देऊन काम करण्याची आवश्यकता आहे. हे ध्यानात घेऊन आज ती जबाबदारी सगळ्या सहका-यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मध्यंतरी वर्धा येथील सेवाग्राममध्ये आदिवासींमध्ये काम करणारे आदिवासी गावाचे गावप्रमुख यांचे एक संमेलन घेतले होते. शेकडो लोक व भगिनी होत्या. आपल्या गावाच्या हिताची जपणूक करण्यासाठी कष्ट करायला कुठलीही कमतरता नाही या गोष्टी पदोपदी त्या सांगत होत्या. आणि त्या रस्त्याने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या पाठीशी ही सगळी शक्ती उभी आहे. त्यांच्या पाठीशी चव्हाणसेंटर उभे राहिल आणि उपेक्षित माणसाला साथ देईल अशी खात्री शरद पवार यांनी यावेळी दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार ’ दिला जातो. यावर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ अझीम प्रेमजी यांना जाहीर झाला आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ​ जयंतीदिनी म्हणजेच १२ मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शरद पवार यावेळी म्हणाले,”मला आनंद आहे की निवड समितीने सत्कारासाठी अतिशय उत्तम व्यक्तींची निवड केली आहे. अझीम प्रेमजी यांचे विज्ञानाच्या क्षेत्रात असलेले योगदान आणि धनसंपत्ती मिळाल्यानंतर ती समाजाच्या भल्यासाठी वापरावी याची अखंड नोंद त्यांनी ठेवली.अझीम प्रेमजी यांचा मी आभारी आहे की त्यांनी हा चव्हाण सेंटरचा सन्मान स्वीकारून या सन्मानाची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम केले. याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.”

यावेळी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपटच उलगडला. 

आजचा दिवस चव्हाणसाहेबांचा ११० वा जन्मदिवस साजरा करण्याचा महोत्सव आहे. गेले अनेक वर्षे त्यांच्याशी संबंधित असणारे दिवसाचे कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरे करत आहोत. उभं आयुष्य त्यांनी देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी दिले. सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानवयात पितृत्व गमावले आणि मातेच्या छत्रछायेखालील मार्गदर्शनाखाली ज्यांची उभारणी झाली असे हे चव्हाणसाहेब… त्यांची सगळी पार्श्वभूमी बघितल्यानंतर महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबात एखादी व्यक्ती जन्माला आली आणि कठीण परिस्थितीत कष्ट करण्याचा प्रयत्न करते याचे उत्तम उदाहरण चव्हाणसाहेबांचे आहे असेही शरद पवार म्हणाले. 

घरामध्ये फारसं कुणी शिक्षित नाही. त्यांचे बंधू टेक्स्टाईलमध्ये काम करत होते. तेही गेले. मातेचा आश्रय मात्र त्यांना अनेक वर्षे लाभला. त्यांच्या मातेच्या मनात एका कल्पना होती ती एकप्रकारे अज्ञानच सांगणारी होती. त्याचे एकच उदाहरण शरद पवार यांनी सांगितले, यशवंतरावजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांच्या गावी लोकांनी दिवाळी साजरी केली. काही लोक त्यांच्या घरी ज्याठिकाणी त्यांच्या मातोश्री होत्या (त्यांचे नाव विठाबाई) त्यांना भेटायला गेले. त्यांनी पेढे दिले त्यावेळी विठाबाई यांनी पेढे कसले अशी विचारणा केली. त्यावेळी यशवंतराव मुख्यमंत्री झाले असे त्या लोकांनी सांगितले. त्या माऊलीला मुख्यमंत्री म्हणजे काय माहीत नव्हते. तिने त्यांना प्रश्न विचारला आपल्या गावच्या तहसीलदाराइतका मोठा झाला का? त्यांच्यादृष्टीने त्यावेळी तहसीलदार, फौजदार हेच मोठे होते. महाराष्ट्र चालवण्याचे सूत्र त्यांच्या हातात होते. त्यांच्या पदाची जाण मातोश्रींना नव्हती. अशी पार्श्वभूमी चव्हाणसाहेबांच्या घरची होती हेही आवर्जून सांगितले. 

स्वातंत्र्याच्या चळवळीत काम केले. अनेक वर्षे तुरुंगात गेले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विधीमंडळात गेले. मंत्री म्हणून काम केले. आणि ५६ नंतर गुजरात – महाराष्ट्र एकत्र होते त्यावेळी एकत्रित राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी पडली. सामान्य माणसाला मराठी लोकांचे राज्य हवे होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती आणि त्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आली. फार कालखंड लाभला नाही. देशावर संकट आले त्या संकटातून भारताला बाहेर काढण्यासाठी त्यांना दिल्लीला जावे लागले. संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीच्या कालखंडात २० वर्षात विरोधी पक्षनेता, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री या सरकारमधील ज्या महत्वाच्या जागा आहेत त्याठिकाणी नेतृत्व करण्याची भूमिका त्यांना पार पाडावी लागली आणि ते काम त्यांनी उत्तमरितीने केले. उत्तम प्रशासक, देशाचा विचार करणारा नेता म्हणून आपण त्यांचा विचार नेहमीच करतो असेही शरद पवार यांनी सांगितले. 

सार्वजनिक जीवनात कसे वर्तन असावे याचे आदर्श यशवंतराव चव्हाण होते. ते गेल्यानंतर काही गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या होत्या. त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी काही लोकांवर टाकली होती. त्यात माझाही थोडा सहभाग होता ही आठवण सांगतानाच दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या इतकी वर्षे सत्तेच्या राजकारणात असलेल्या या व्यक्तीचे गेल्यानंतर साधनसंपत्ती ही कितपत असावी आपल्याला आश्चर्य वाटेल बँकेचे खाते आम्ही बघितले त्यात फक्त २७ हजार रुपये होते. त्याचे धन काय होते तर वाचनसंस्कृती होती. जे काही पैसे मिळाले ते पुस्तके खरेदी करण्यासाठी गेले. काही हजार दुर्मिळ ग्रंथ त्यांच्या घरी सापडले. आज त्याठिकाणी ग्रंथालय करून ठेवण्यात आले आहे. म्हणून मला आनंद आहे नवीन पिढी तिथे जाऊन वाचन करतात व वाचनसंस्कृतीचे जतन करत असतात. आज अशा थोर व्यक्तीमत्वाचे आपण स्मरण करत आहोत असेही शरद पवार म्हणाले. 

संसदेत जातो त्यावेळी नवीन सदस्य संसदेत पाऊल टाकतो आणि लोकसभेच्या सभागृहात जातो त्या सभागृहाच्या दारासमोर एकच पुतळा आहे तो चव्हाणसाहेबांचा आहे. तो पुतळा हेच सांगतो की, सदनामध्ये तुम्ही जात आहात त्यावेळी संसदीय संस्थेची प्रतिष्ठा याच्यात कधी तडजोड करू नका. सुसंस्कृतपणा कधी सोडू नका. या देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी तुम्ही सदनामध्ये प्रवास करता आहात याची अखंड नोंद ठेवा. हा विचार त्या सदनामध्ये शिरलेल्या प्रत्येक व्यक्तीला येतो आणि त्याचा आनंद, अभिमान आम्हा सर्वांना आहे असेही शरद पवार म्हणाले.

नेहमीच त्यांच्या या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करत असतो. आज याठिकाणी प्रतिभा शिंदे आणि त्यांचे सहकारी यांची उपस्थिती आहे. चव्हाण सेंटरने आज नवीन विभाग सुरू केला आहे तो म्हणजे सायबर वेल्फेअर सेंटर सुरू केला त्याबद्दल आनंद व्यक्त केला.