पालखेड येथील चौघांचा गोदावरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

वैजापूर ,११ मार्च / प्रतिनिधी :- श्रीक्षेत्र मढी येथे कानिकनाथ यात्रेसाठी जात असताना प्रवरा संगम येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या चौघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (ता.11) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील काही तरुण प्रवरा संगम येथे थांबले असता ते नदीत अंघोळीसाठी उतरले होते. यातील चौघे तरुण नदीपात्रात बुडाल्याची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तरुणांचा शोध सुरू केला. अग्निशामक दल ही पाचारण करण्यात आले. तब्बल चार तासाच्या शोध मोहीमेनंतर पाण्यात बुडालेल्या चारपैकी शंकर पारसनाथ घोडके व नागेश दिलीप गोरे या दोन तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर अन्य दोघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आ.रमेश बोरणारे यांनी घटनास्थळी धाव घेतली व शोध मोहिमेत सहकार्य केले.

मृत पावलेल्या मध्ये बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (वय 20), आकाश भागिनाथ गोरे (वय 20) व शंकर पारसनाथ घोडके (वय 22) या चौघांचा समावेश आहे. हे चौघेही वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे पालखेड गावांमध्ये शोककळा पसरली आहे.