वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदार यादी प्रसिध्द

इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात 

वैजापूर ,२१ मार्च / प्रतिनिधी :- कोरोना व इतर कारणामुळे लांबणीवर पडलेल्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून बाजार समितीच्या या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या 18 जागा असून एकूण मतदार संख्या 3087 आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

2021 मध्ये बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. कोरोना व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समितीच्या निवडणुका घेण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे  बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक लांबणीवर पडली होती. संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर बाजार समितीवर प्रशासक होते.वर्षभराच्या मुदत वाढीनंतर बाजार समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत मतदारयादी बाबत हरकती मागविण्यात आल्या होत्या.कोणत्याही हरकती प्राप्त न झाल्याने अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघ 11जागा (मतदार संख्या-1470), ग्रामपंचायत मतदारसंघ 04 जागा (मतदारसंख्या -1135), व्यापारी मतदारसंघ 02 जागा (मतदारसंख्या – 162) व हमाल मापाडी मतदारसंघ 01 जागा (मतदारसंख्या 320) अशा 18 जागांसाठी ही निवडणूक होणार असून एकूण मतदार संख्या 3087 आहे. बाजार समितीची अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती सहायक निबंधक विनय धोटे यांनी दिली.