महिलांनी स्वाभिमानाने जगावे – आयपीएस महक स्वामी

वैजापूर ,२१ मार्च / प्रतिनिधी :- महिला विकासाच्या केंद्र बिंदू आहेत. त्यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केल्यास व त्यांच्याद्वारे निर्मित वस्तूला प्राधान्यक्रमाने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास देशाचे आर्थिक सबलीकरण होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांनी मंगळवारी (ता.21) तालुक्यातील जीवन विकास महाविद्यालय शिऊर येथील व्यवसाय प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना केले.

महक स्वामी पुढे म्हणाल्या की, महिलांनी चुकीच्या मार्गाने न जाता अंग कौशल्य आधारे विविध वस्तू निर्मित करून स्वाभिमानाने जगावे व आपल्या मुलांवर योग्य संस्कार करून त्यांना उच्च शिक्षण द्यावे.प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी विशद केले की, जगाच्या एका पाहणीत असे दिसून आले आहे की, या पुढे पैशाने श्रीमंत असणाऱ्यांचे स्थान दुय्यम राहणार तर चारित्र्याने श्रीमंत असणाऱ्याचे स्थान समाजात अतिउच्च राहणार आहे. महिलांनी प्रशिक्षणामधील ज्ञानातून स्वावलंबी व्हावे व समाजात उच्च स्थान प्राप्त करावे.

या प्रसंगी माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील, निर्मला इन्स्टिट्यूटच्या नॅन्सी रोद्रीग्ज, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी ही महिलांना संबोधित करून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण यावर जोर देत महिलांनी धीट, सुदृढ व सबल होऊन आपला व कुटुंबाचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे.के.जाधव विकास मंचचे अध्यक्ष जे.के.जाधव होते.दोनशे महिलानी विविध व्यवसाय प्रशिक्षण घेतले असून त्या गृह उद्योगातून अर्थार्जन करून स्वावलंबी बनत आहेत. या प्रसंगी ऐश्वर्या व्यवहारे, कल्पना पवार, तेजल पगारे,द्वारका पवार,योगिता वैष्णव तेजस्वीनी कुलकर्णी यांनी आपले प्रशिक्षण नंतरचे वस्तू तयार करून विकण्याचे अनुभव कथन केले. प.पू.तातेराव बारसे महाराज ,गोशाळा जामबरखेडा, सरपंच गोकुळ आहेर, राजकुमार कांबळे, व्ही.के.बोडखे, यु.के.सानप, नारळा सरपंच मनोज पाटील, बाळासाहेब सावंत, वेणूनाथ सोमासे, सरपंच जाधव व आढाव आदींची उपस्थिती होती.