वैजापुरात वाळू माफियांच्या दोन गटात हाणामारी ; तीन जण जखमी

वैजापूर,२२ एप्रिल  /प्रतिनिधी :-जुन्या भांडणाच्या कारणावरून वाळू माफियांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना बुधवारी (ता.20) दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास शहरातील येवला रस्त्यावरील नवीन बसस्थानक परिसरात घडली. या घटनेत एक जण गंभीर तर दोघेजण किरकोळ जखमी झाले असून, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दिनेश शिंदे (वय 24 वर्षे) यास उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.या संदर्भात मिळालेल्या माहितीनूसार तालुक्यातील  रोटेगाव येथील संतोष बंगाळ व अक्षय बंगाळ या दोघांचा गावातीलच दिनेश शिंदे याच्याशी गुढीपाडव्याच्या दिवशी वाद झाला होता. परंतु नंतर तो वाद मिटला होता. दरम्यान 20 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास संतोष बंगाळ व अक्षय बंगाळ या दोघांनी दिनेश शिंदे याला फोन करून शहरातील येवला रस्त्यावरील नवीन बसस्थानक परिसरात बोलावून घेतले. दिनेश शिंदे याच्यासोबत त्याचा अन्य एक सहकारीही होता. तेथे या चौघांमध्ये चाकूसह दगड, लाथाबुक्यांनी व लोखंडी राॅडने फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यात दिनेश शिंदे याच्या कानामागे चाकू लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याच्या कानातून रक्तस्राव होत होता. त्यामुळे त्याला तत्काळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याला जास्त दुखापत झाली असल्यामुळे त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. तर संतोष व अक्षय बंगाळ हे दोघेही किरकोळ जखमी झाले असून या दोघांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान या घटनेतील दोन्हीही गटातील वाळूमाफिया असून हाणामारीचे कारण हे  वाळूच असल्याची चर्चा घटनास्थळी ऐकावयास मिळत होती.