ट्रकच्या धडकेत कारमधील पती – पत्नीसह तिघे जण ठार

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील घटना ;  अपघातातून दोन चिमुकले बचावले

वैजापूर ,​१० मार्च / प्रतिनिधी :- भरधाव ट्रकने कारला पाठिमागून जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाल्याची घटना 6 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील तालुक्यातील हडसपिंपळगावनजीक घडली. या अपघातातून दोन लहान मुले बालंबाल बचावले.  दरम्यान सोमवारी रात्री पाऊस सुरु असल्यामुळे फसलेल्या जखमींना कारमधून बाहेर काढण्यासाठी मदत विलंब झाला. परिणामी तिघांनाही छत्रपती संभाजीनगर येथे गेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. 

अनिल राठोड ( 37 ), त्यांची पत्नी भाग्यश्री राठोड ( 32 ) व रोहित सुनील राठोड ( 13 ) रा.  पळशीतांडा क्रमांक 2, छत्रपती संभाजीनगर अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अनिल राठोड यांचा मुलगा आदित्य ( 12 ) व मुलगी लावण्या (13 )  ही दोन मुले अपघातातून बालंबाल बचावली.  याबाबत अधिक माहिती अशी की, 6 मार्च रोजी अनिल राठोड हे पत्नी व मुलांसह स्विफ्ट कारने ( क्रमांक एमएच 14 एफ. सी. 5387 ) नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरून शिर्डीकहून छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना पाठिमागून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने ( क्रमांक एमएच 18 बी. जी. 7702 ) स्विफ्ट कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला. त्यामुळे कारमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी महामार्गावरील जवानाना मोठी कसरत करावी लागली.

ही घटना महामार्गावरील हडसपिंपळगावनजीक असलेल्या टोलनाका परिसरातील महामार्ग चॅनल क्रमांक 471.3  जवळ घडली. घटनेनंतर महामार्गावरील जवानांनी रुण्णवाहिकेस पाचारण करून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ हलविण्यात आले. तसेच मदतीसाठी हडसपिंपळगाव येथील पोलिस पाटील कारभारी निघोटे यांच्यासह नागरिक धावून आले. दरम्यान जखमींना संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून अनिल राठोड, भाग्यश्री राठोड व रोहित राठोड या मृत घोषित केले. ते तिघेही कारमध्ये फसल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यास विलंब लागला. याशिवाय पाऊसही सुरू होता. यावेळी आदित्य व लावण्या हे दोघेही घाबरून गेले. घटनेनंतर नातलगांनी तेथे येऊन ते दोघांना घेऊन गेले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.