बँकेच्‍या विशेष सहाय्यकाला शिवीगाळ करुन मारहाण,आरोपीला कोर्ट उठेपर्यंत शिक्षेसह दंड

औरंगाबाद, २१ऑक्टोबर /प्रतिनिधी :- बँकेत खाते उघडण्‍यासाठी ओळखपत्र मागितल्याने बँकेच्‍या विशेष सहाय्यकाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एस. कुलकर्णी यांनी कोर्ट उठेपर्यंत शिक्षेसह दंड ठोठाविली. निसार अहेमद अब्दुल रज्जाक (४९, गणेश कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.

प्रकरणात रेणुकादास गोपाळराव चक्रे (५९, रा. प्रेरणानगर, गारखेडा) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, चक्रे हे चौराह येथील बँक ऑफ महाराष्‍ट्रात विशेष सहाय्यक म्हणुन कार्यरत होते. १० ऑगस्‍ट २०१० रोजी सकाळी साडेदहा वाजेच्‍या सुमारास चक्रे हे कर्तव्‍यावर असतांना एक महिला व आरोपी निसार अहेमद तेथे आला. त्‍याने चक्रे यांना महिलेचे बँकेत खाते उघडायचे असल्याचे सांगितले. त्‍यावर चक्रे यांनी बँकेचा फार्म भरुन देण्‍यास सांगितले. आरोपीने भरलेला फार्म चक्रे यांना दिला. चक्रे यांनी फार्म सोबत दिलेल्या कागदपत्रांमध्‍ये महिलेचे ओळखपत्र जोडण्‍यास सांगितले. तेंव्हा ओळखपत्र महाविद्यालयात जमा असल्याचे महिलेने सांगितले. चक्रे यांनी खाते उघडण्‍यासाठी ओळखपत्र आवश्‍यक आहे, त्‍याशिवाय खाते उघडता येणार नसल्याचे सांगितले. त्‍यावर चिडलेल्या आरोपीने तु जानून बुजून आम्हाला त्रास देत असल्याचे म्हणत चक्रे यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. या मारहाणीत चक्रे यांचे शर्ट फाटले, तसेच चष्‍मा देखील तुटला. या प्रकरणात सिटीचौक पोलिस  ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

तपास अधिकारी तत्कालीन जमादार एस.आर. बागुल यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतिष मुंडवाडकर आणि सरकारी वकील बी.ए. आढावे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. आरोपीला सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भादंवी कलम ३५३ अन्‍वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा ठोठावली.