पैशांसाठी पत्‍नीला जाळुन मारणाऱ्या नराधम पतीला जन्‍मठेप

औरंगाबाद, २१ऑक्टोबर /प्रतिनिधी :-

पैशांसाठी पत्‍नीला जाळुन मारणाऱ्या  नराधम पतीला जन्‍मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एस. भिष्‍मा यांनी ठोठावली. सुदाम यमाजी भालेकर (४०, रा. निपाणी ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे पतीचे नाव आहे.

या प्रकरणात मृत  राधाबाई सुदाम भालेकर (३५, रा. निपाणी ता.जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, आरोपीची जमीन सोलापुर हायवे मध्‍ये गेली होती. म्हणुन त्‍याला सहा लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली होती. त्‍यापैकी चार लाख रुपये मुलीच्‍या लग्नासाठी फिर्यादीच्‍या नावे बँकेत टाकले होते. आरोपीने दोन लाख रुपये दारु व जुगारात उडवले होते. ६ फेब्रुवारी २०१८ रोजी आरोपीने फिर्यादाला एक लाख रुपये मागितले. मात्र मृताने  नकार दिला. पैसे न दिल्यास जीवे मारीन अशी धमकी देत आरोपीने रागाच्‍या भरात फिर्यादीच्‍या अंगावर रॉकेलची कॅन ओतून तिला पेटवून दिले. मात्र फिर्यादीने लागलीच आरोपीला मिठी मारली. आरोपीने फिर्यादीचा जीव वाचविण्‍या ऐवजी तिला ढकलून देत स्‍वत: घरा बाहेर पळुन गेला. घटनेच्‍या वेळी त्‍यांची मुलगी तेथे उपस्थित होती. तिने फिर्यादीच्‍या अंगावर पाणी ओतून आग विझविली. त्‍यानंतर फिर्यादी व आरोपीला उपचारासाठी घाटीत दाखल करण्‍यात आले. उपचार सुरु असताना ११ फेबु्रवारी २०१८ रोजी फिर्यादीचा मृत्‍यू झाला. या प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्‍ह्याचा तपास करुन तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक सुधाकर चव्‍हाण यांनी दोषारोपपत्र दखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात फिर्यादीचा मृत्‍यूपूर्व जबाब घेणारे विशेष दंडाधिकारी, पोलीस व डॉक्‍टर यांची साक्ष महत्वाची ठरली. विशेष म्हणजे प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदार असलेली मयताची मुलगी मात्र फितुर झाली. सरकार पक्षाच्‍या वतीने तिची उलट तपासणी घेण्‍यात आली असता, तिने वडीलांना शिक्षा होऊ नये व इतर महत्वांच्‍या गोष्‍टी कबुल केल्या. दोन्ही बाजुंच्या युक्तिवाद यानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. आरोपीला पत्‍नीचा खून केल्याप्रकरणी भादंवी कलम ३०२ अन्‍वये जन्‍मठेप आणि २० हजार दंडांची शिक्षा ठोठावली दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने सक्तमजुरी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पैरवी म्हणुन सहायक फैजदार नईम शेख आणि एलपीसी सी.यु. नगराळे यांनी काम पाहिले.