लाडगावच्या ग्रामस्थांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारे चार हायवा ट्रक पकडले

वैजापूर,२२ एप्रिल  /प्रतिनिधी :- गोदावरी नदीच्या पात्रातुन क्षमतेपेक्षा अधिक वाळू घेऊन जाणारे चार हायवा ट्रक गावकऱ्यांनी पकडल्याची घटना बुधवारी रात्री तालुक्यातील लाडगाव येथे उघडकीस आली. विरगाव पोलिसांनी हे चार ट्रक हस्तगत केले असून पोलिस ठाण्यात उभे केले आहेत. या वाहनांवर कारवाई करावी असे पत्र विरगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस प्रमुखांनी तहसीलदरांना दिले आहे.‌ रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकिस आली.

गोदावरी नदीपात्रातुन एम. एच.46 एफ 4640, एम.एच.20 डी.ई. 7550 एम.एच.20 ई.जी. 8532 व एम.एच.20 ई.एल 1011 या चार वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आल्यानंतर लाडगाव येथे ग्रामस्थांनी ट्रक अडवले. यावेळी ट्रक चालकांनी त्यांच्यासोबत अरेरावी व दमबाजी केल्याने वातावरण चिघळण्याच्या मार्गावर होते. मात्र लाडगाव येथील सत्यजित सोमवंशी यांनी याबाबत पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विरगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन ओव्हरलोड वाळुचे ट्रक ताब्यात घेतले. या वाहनांवर तहसीलदारलदार काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.