वैजापूर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी ; पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याकडून प्रशस्तीपत्र

पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांना प्रशस्तीपत्र प्रदान 

वैजापूर ,५ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील मुंबई – नागपूर हायवेवर शिवराई – करंजगाव रस्त्यावर रात्रीच्यावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीस्वारांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करुन महिलांच्या अंगावरील 90 हजार रुपये किंमतीचे दागिने लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अडीच तास पाठलाग पुरणगाव रस्त्यावरील शेतातून दोघांना शिताफीने अटक केली. या प्रशंसनीय कामगिरीबद्दल वैजापूर पोलिसांना पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी प्रशस्तीपत्र दिले.पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांना हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. 

वैजापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी महक स्वामी, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे,पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलिस उपनिरीक्षक  रज्जाक शेख, सहाय्यक फौजदार महादेव निकाळजे, विठ्ठल जाधव आदीं यावेळी उपस्थित होते.

घटनेची माहिती

सौरभ उर्फ बाबू विकी रुझासिओ (वय 19 वर्ष रा. ईनामवाडी, शिर्डी ता. जि. अहमदनगर) व  कृष्णा प्रकाश भोळे (वय 24 वर्ष रा. आंबेडकरनगर, सिन्नर जि.नाशिक) असे पकडलेल्या चोरटयांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात  अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरी, दरोडयांचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बोलेरो कंपनीची जीप, चाकू, लोखंडी राॅड असे साहित्य पोलिसांनी जप्त करण्यात आले.

पोलिसांनी अंधारात पायी पाठलाग करुन दोन चोरटे पकडले

नागपूर – मुंबई हायवे मार्गावरील शिवराई येथे दोन दुचाकीस्वारांना जखमी करुन महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पळालेल्या बोलेरो जीपचा मागील बाजूचा क्रंमाक महिलांनी पोलिसांना दिल्यामुळे गुन्ह्यातील पांढऱ्या रंगाची बोलेरो क्रमांक- एम.एच. -23 ए.डी.-1216 वाहन पकडण्यासाठी जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली होती. शिवराई, करंजगाव येथे दुचाकी स्वारांना लुटल्यावर आरोपी वैजापूरच्या दिशेने येत असल्याचे महिती मिळाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी वैजापूर पोलिसांची तीन पथके रस्त्यावर ठिकठिकाणी तैनात करण्यात आली.

शहरातील आंबेडकर चौकातील नाकाबंदीचा अडथळा भरधाव वेगाने तोडून येवला रोडच्या दिशेने जाणाऱ्या संशयित वाहनाचा वैजापूर पोलिसांच्या  पथकाने पाठलाग सुरू केला असता आरोपींनी  पोलिसांना चकवा देण्यासाठी अचानक पुरणगाव रोडच्या दिशेने वाहन वळवले त्यामुळे पाठलाग करणाऱ्या पथकातील वाहनांना त्यांनी चकवले. मात्र पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी त्यांच्या खाजगी वाहनातून आरोपीच्या वाहनाचा पाठलाग सुरु ठेवल्यामुळे पोलिस मागावर असल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला वाहन उ़भे करुन शेतातील पिकात लपण्यासाठी पळाले.पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख, सहाय्यक फौजदार महादेव निकाळजे, सहाय्यक फौजदार विठ्ठल जाधव, पोलिस अंमलदार योगेश झाल्टे, भगवान सिंघल, प्रशांत गिते, विजय भोटकर, वाल्मीक बनगे, गोरक्ष सदगीर, नवनाथ केरे, नवनाथ निकम, ज्ञानेश्वर पाडळे, गणेश पैठणकर, महिला पोलीस नाईक सिमा जाधव व तीन होमगार्ड यांच्या पथकाने अंधारात त्यांचा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून सौरभ उर्फ बाबू विकी रुझासिओ (वय 19 वर्ष रा. ईनामवाडी, शिर्डी ता. जि. अहमदनगर) व  कृष्णा प्रकाश भोळे (वय 24 वर्ष रा. आंबेडकर नगर सिन्नर जि.नाशिक) यांना पकडले होते.