ऑनलाइन आयपीएल सट्टा खेळणाऱ्या चौघांविरुद्ध वैजापुरात गुन्हा दाखल ; 3 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त

वैजापूर,१७ एप्रिल  /प्रतिनिधी :- आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन पैसे लावून जुगार खेळणाऱ्यावर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, इलेक्ट्रिक दुचाकी, मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये असलेली रक्कम असा 3 लाख 35 हजार 968 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Bengaluru: Four held for online IPL betting

यात कृष्णा दिलीप धुळे (35 रा. लक्ष्मीनगर) याच्याकडुन रोख 49 हजार 800 रुपये, 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल, एक लाख रुपये किंमतीची इलेक्ट्रिक दुचाकी, मोबाईल ॲप्लिकेशन मधील दहा हजार रुपये व 95 हजार 768 रुपयांचे ट्रान्सॲक्शन, विविध बॅकाचे डेबिट कार्ड असा सुमारे 2 लाख 65 हजार 568 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर दुसरा आरोपी अजय मोहनसिंग राजपूत (30, रा.काटे हनुमान मंदिर) यांच्याकडून दहा हजार 499 रुपये रोख, मोबाईल, मोबाईल ॲप्लिकेशनवरील आयडीवर असलेले वीस हजार रुपये शिल्लक व 40 हजार रुपये किमतीची दुचाकी असा 70 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. कृष्णा धुळे व अजय राजपूत या दोघांनी अनुक्रमे अनिकेत अग्रवाल व संकेत अग्रवाल यांच्या सांगण्यावरुन मोबाईलमधील एका ॲप्लिकेशनमध्ये आयडी तयार करुन त्यावरुन विविध ग्राहकांचे आयडी तयार करुन सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेटमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ व त्यानंतरची दिल्ली विरुद्ध आरसीबी सामन्यांवर कोण टॉस जिंकेल, कोण मॅच जिंकेल, रन कोण व किती बनवणार असे फोनद्वारे ऑनलाईन जुगार लावुन जुगार जिंकल्यास दुप्पट पैसे देत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी चौघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. 

पंचायत समितीसमोरच्या मोकळ्या जागेत दोघे जण त्यांच्या दुचाकीवर बसुन मोबाइलवरुन लोकांकडुन पैसे घेऊन आयपीएल क्रिकेट सामन्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय खोकड यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंच व खोकड यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल महेश बिरुटे, प्रशांत गिते यांच्या पथकाने पंचायत समितीसमोरील जागेत छापा टाकून ऑनलाईन आयपीएल सट्टा खेळणाऱ्या दोघांना पकडले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय खोकड हे अधिक तपास करीत आहेत.