वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे शुक्रवारी उद्घाटन

पर्यावरणविषयक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट, लघुपटांची रेलचेल

वसुंधरा सन्मान, वसुंधरा मित्र पुरस्कारांची घोषणा

औरंगाबाद,२० फेब्रुवारी / प्रतिनिधी :-यंदाच्या किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पर्यावरणविषयक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट, लघुपटांची रेलचेल असणार आहे. शुक्रवारी (ता. २४) या दोनदिवसीय महोत्सवाचे उद्घाटन होईल. यानिमित्ताने देण्यात येणाऱ्या वसुंधरा सन्मान आणि वसुंधरा मित्र पुरस्कारांची घोषणाही सोमवारी (ता. २०) आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

शहरात तीन वर्षानंतर पुन्हा 24 व 25 फेब्रुवारीला वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल होत आहे. रेल्वेस्टेशन रोडवरील भानुदास चव्हाण सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात “सकस आहार, बहरलेला निसर्ग व सुदृढ समाज” या थीमवर आधारित चित्रपट, लघुपट आणि चर्चासत्रे होणार आहेत. शुक्रवारी (ता. २४) सकाळी १० वाजता पुण्याच्या भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनचे चीफ प्रोग्राम एग्झिक्युटिव्ह संजय पाटील यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ कृषीतज्ञ विजयअण्णा बोराडे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी ‘हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून सकस अन्नसुरक्षेसाठी शेतीतील जैवविविधता’ या विषयावर श्री. पाटील यांचे व्याख्यान होणार आहे.

यावेळी वसुंधरा मित्र पुरस्कारही प्रदान केले जातील. सकाळी साडे अकरा वाजता ‘टिंबक्टू’ ही ओपनिंग फिल्म दाखवून महोत्सवाला सुरुवात होईल. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महोत्सवाच्या थीमवर आधारित विविध चित्रपट आणि दोन छोटी चर्चासत्रे होणार आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २५) सकाळी ७ ते ९ या वेळेत हिमायत बागेत नेचर वॉक होणार आहे. यावेळी फळ संशोधन केंद्राचे कृषी अधिकारी अविनाश देवळे आणि मानद वन्यजीव संरक्षक डॉ. किशोर पाठक हे येथील जैविविधतेबद्दल माहिती सांगणार आहेत. त्यानंतर 9 ते 11 या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी खास चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील आणि त्यावेळी परस्परसंवादी पद्धतीने चर्चाही होईल. दुपारी दिनकर पाटील यांचे मधुमक्षिका पालन आणि महत्त्व या विषयावर व्याख्यान होईल.

महोत्सवाचा समारोप संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, ग्रामोद्योग शिक्षण मंडळाचे डॉ. यज्ञवीर कवडे, महोत्सव संचालक वीरेंद्र चित्राव यांच्या उपस्थितीत सायंकाळी होणार आहे. यावेळी वसुंधरा सन्मान पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यानंतर प्रमोद देशमुख यांचे ‘अन्न, पोषण आणि सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान होईल. साडे सात वाजता ‘उर्वरस’ ही क्लोजिंग फिल्म प्रदर्शित केली जाणार आहे.

—————–

गाव फटाकेमुक्त करणाऱ्या डॉ. संतोष पाटील यांना वसुंधरा सन्मान

या फिल्म फेस्टिव्हलमध्ये देण्यात येणाऱ्या वसुंधरा सन्मान आणि वसुंधरा मित्र पुरस्कारांची घोषणा सोमवारी आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. यात सिल्लोड तालुक्यातील बहुली हे गाव फटाकेमुक्त करणारे अभिनव प्रतिष्ठानचे डॉ. संतोष पाटील यांना वसुंधरा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे औद्योगिक क्षेत्रात वृक्षसंवर्धन करणारे पोपटराव रसाळ, सातारा डोंगररांगेत श्रमदानातून बंधारे बांधून भूजलपातळी आणि जैवविविधता वाढवणारे रामेश्वर दुसाने, जनसहयोग संस्थेच्या माध्यमातून देशी वृक्षलागवड करणारे प्रशांत गिऱ्हे, वनीकरण वाढवण्यासाठी काम करणारे रोहित ठाकूर यांना वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

———————–

महोत्सवाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी या विषयावर आधारित चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात येतील. सकस अन्नाची ओळख व्हावी म्हणून विशेष प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. महोत्सवात सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे, पण जागेच्या उपलब्धतेमुळे शाळांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी महोत्सवाचे समन्वयक सुहास वैद्य (9823030456) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन रोटरी इलाईटचे अध्यक्ष अभय मार्थ, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सचे अध्यक्ष डॉ. उत्तम काळवणे, ओंकार विद्यालयाचे कार्यवाह हरीश जाखेटे आणि ऊर्जा सहयोगचे श्रीयुत काबरा यांनी केले आहे.