रूग्णालयांनी तत्परतेने खाटांसह उपचार सुविधांमध्ये वाढ करावी – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

औरंगाबाद, दि.08 :- कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावात रूग्णांना वेळेत योग्य उपचार सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासकीय रूग्णालयांसह सर्व खाजगी रूग्णालयांनी जास्त संख्येने खाटा आणि उपचार सुविधांमध्ये तत्परतेने वाढ करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी रूग्णालयातील उपचार सुविधांबाबतच्या तसेच मेडीकल टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, उपायुक्त वर्षा ठाकूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी येत्या काळातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्व क्षमतेसह उपचार सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात तातडीने वाढ करणे ही काळाची गरज आहे. आपत्कालीन ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासकीय रूग्णालयांसोबत सर्व खासगी डॉक्टर्स, रूग्णालये यांची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यादृष्टीने सर्व खासगी रूग्णालयांनी आपल्या क्षमता वाढीसाठी स्वत:हून पुढाकार घेत कोविड रूग्णालय म्हणून अधिक योगदान देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे सांगून श्री. केंद्रेकर यांनी धुत, एमजीएम यांच्याप्रमाणे बजाज, हेडगेवार या आणि त्यांच्यासारख्या मोठ्या रूग्णालयांनी अतिरिक्त शंभर, दोनशेपेक्षा अधिक संख्येने कोरोना रूग्णांसाठी उपचार सुविधा उभारली पाहिजे. ज्या-ज्या रूग्णालयांना आपले संपूर्ण रूग्णालय कोविड रूग्णालय करणे शक्य आहे त्या सर्वांनी शंभर टक्के कोविड रूग्णांसाठी सेवा उपलब्ध करून द्यावी. ज्या रूग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्यांनी रूग्णालय परिसरातील प्रतिक्षा सभागृह, वस्तू संग्रह विभाग, प्रशासकीय दालन, स्वागत कक्षाची जागा या सर्व पर्यायी जागांचा वापर खाटांच्या उपयोगासाठी करावा. ज्या खाटांना ऑक्सीजन पाईपलाईनव्दारे पुरवठा करणे शक्य नाही अशा ठिकाणी ऑक्सीजन सिलेंडरव्दारे पुरवठा करावा, खाटांसह उपचार सुविधांमध्ये येत्या आठ दिवसात वाढ करावी.

घाटीमध्ये अतिरिक्त 400 खाटांची तर जिल्हा रूग्णालयातही 300 खाटांपर्यंत उपचार सुविधा वाढवाव्यात. एमजीएमने 550 पर्यंत खाटांमध्ये वाढ करावी तर धूतने 150, हेडगेवार 200, बजाजने 100 अतिरिक्त खाटांची वाढ येत्या आठ दिवसात करून रूग्णांना योग्य पद्धतीने उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहरातील सर्व इतर रूग्णालयांनी आपल्या क्षमतांमध्ये जास्तीत जास्त वाढ करणे गरजेचे असून या प्रमाणे निर्देशांचे पालन न करणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई केल्या जाईल, असे श्री. केंद्रेकर म्हणाले.

तसेच रूग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा देताना डॉक्टरांनी रूग्णांना धीर देत त्यांच्या तब्येतीमधील चढउतारांवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोरोना रूग्णाचा मृत्यूदर हा शून्यावर आणण्याचे आव्हान यशस्वी करण्यासाठी गंभीर रूग्णांची योग्य काळजी घेणे हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. त्या दृष्टीने गंभीर रूग्णांबाबत विशेष खबरदारीपूर्वक उपचार नियमावलीचे चोख पालन करावे, असे सूचीत करून श्री. केंद्रेकर यांनी प्रत्येक रूग्णालयात रूग्णाचे, नातेवाईकांचे डॉक्टरांनी समुपदेशन करावे. तसेच ऑक्सीजन, औषध उपलब्धता पूरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावी. गंभीर स्थितीतील रूग्णांची विशेष काळजी घेण्याबाबतचे योग्य प्रशिक्षण संबंधित डॉक्टरांना द्यावे. त्याचप्रमाणे रूग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्यांची देखभाल घेण्याबाबत रूग्ण आणि नातेवाईक दोघांनाही योग्यरित्या नियमावली, घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करावे. रूग्णाला रूग्णालयांतून घरी सोडण्यासाठीच्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे, जेणेकरून त्यांच्याव्दारा नंतर होणाऱ्या संसर्गाचा धोका वेळीच रोखल्या जाईल. त्याचप्रमाणे घरी बरे होऊन गेलेल्यांवरही योग्य निरीक्षण, संपर्क ठेऊन त्यांच्या तब्येती बाबतची माहिती मनपाने नियमित ठेवावी.

खासगी रूग्णालयांनी उपचारासाठी वाजवी दर आकारावेत. तसेच देयकाबाबत कुणाचा आक्षेप असल्यास संबंधितांना दरांबाबत व्यवस्थित समजावून सांगावे. सध्याच्या आरोग्य आपत्तीच्या काळात सर्वांनी एकत्रित प्रयत्नातून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रूग्णांसाठी समर्पितपणे काम करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने प्रत्येकाने अधिक योगदान देत पुढे यावे. जेणेकरून औरंगाबादसह बाहेरून येणाऱ्या सर्व रूग्णांवर योग्य उपचार करत त्यांना बरे करण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश येईल, असे आवाहनही श्री. केंद्रेकर यांनी यावेळी केले.तसेच बाधित रूग्ण दाखल केल्यापासूनची सर्व माहिती, चाचण्यांचा तपशिल, उपचार पद्धती, याबाबतच्या नोंदी अद्यावत, परिपूर्ण ठेवाव्यात. गंभीर रूग्णांवर योग्य पद्धतीने वेळेत योग्य उपचार झाल्यास निश्चितच रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल, त्यादृष्टीने गंभीर स्थितीतील रूग्णांवर करावयाच्या उपचाराबाबतची नियमावली डॉ. येळीकर आणि डॉ. भट्टाचार्य यांनी तातडीने तयार करून द्यावी. ज्याव्दारे इतर सर्व डॉक्टर्सना त्यानुसार योग्य पद्धतीने गंभीर रूग्ण हाताळणे शक्त होईल.

यावळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी डॉक्टर्स, व्हेंटीलेटर, ऑक्सीजन, उपचार सुविधा उपलब्धता वाढीसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना बाबत माहिती दिली. मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी मेल्ट्रॉनमध्ये दाखल रूग्णांच्या उपचार पद्धती, शहरातील उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीस मनपाच्या डॉ. संगिता पाटील, यांच्यासह डॉ. हेडगेवार रूग्णालय, सेठ नंदलाल धूत, कमलनयन बजाज, एमजीएम, ॲपेक्स, सिग्मा, सिटी केअर, एशियन रूग्णालय, वाय.एस.के., एमआयटी, जे.जे.प्लस, एम्स रूग्णालयांसह इतर खासगी रूगणालयांचे वैद्यकीय, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *