छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा सुवर्ण क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

आग्रा,१९ फेब्रुवारी /प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आग्रा (उत्तर प्रदेश) येथील लाल किल्ल्यामध्ये मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती आज साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचा हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन, आर. आर. पाटील फाउंडेशन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान, औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उत्तर प्रदेशचे विधी एवं न्याय मंत्री श्री. उपाध्य, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय विधी राज्यमंत्री एस. पी. सिह बघेल, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, प्रशांत बंब, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, सतीश चव्हाण‌ आदी मान्यवर उपस्थित होते.

लाल किल्ल्यात शिवाजी महाराजांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले होते. शिवरायांनी याच किल्ल्यात औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते. येथून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून सुखरूप सुटले होते. या ऐतिहासिक लाल किल्ल्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणे हा एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, मी आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आलो आहे. आजचा दिवस अवघ्या महाराष्ट्रासाठी रोमहर्षक आहे. शिवरायांनी मोगल, आदिलशाही, निजामशाहीच्या अत्याचाराच्या कालखंडात हिंदवी स्वराज्य स्थापन करून कल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आजही शिवाजी महाराज हे सदैव मार्गदर्शक आहेत. शिवराय हे कुशल संघटक आणि राजनीतिज्ञ होते. शिवाजी महाराज म्हणजे दैवी शक्तीच. त्यांना केवळ साम्राज्य बनवायचे नव्हते तर रयतेचे कल्याण करायचे होते. स्वातंत्र्याचे बीज त्यांनी रोवले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र आणि हिंदुस्तानचे दैवत म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबास महाराजांनी याच दिवाण – ए – खासमध्ये आपले तेज दाखवून दिले होते. तेथेच आज शिवजयंती साजरी होत आहे. हा दिवस आमच्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी होत आहे. मराठीजनांच्या जीवनातील हा रोमांचक क्षण आहे. आतापासून दरवर्षी येथे शिवजयंती साजरी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी  आदित्यनाथ  यांच्या संदेशाचे यावेळी प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. आर. पाटील फाउंडेशनचे विनोद पाटील यांनी केली.

कार्यक्रमात नितीन सरकटे , हंसराज, वैशाली माडे यांचे गायन, शिवबा पाळणा गायला गेला. शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास सॅन्ड कलेच्या माध्यमातून सर्वम पटेल या कलाकारांनी मांडला. शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर लघुनाटक सादर करण्यात आली.

राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

नवी दिल्ली, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राजधानीत उत्साहात साजरी करण्यात आली. बाल शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवी पाळण्याने, ढोल-ताशांच्या गजराने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या उत्स्फुर्त घोषणांनी महाराष्ट्र सदन दुमदुमले.

शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने  येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या प्रवेश भागातील केंद्रीयस्थानी  छत्रपती शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा विराजमान करण्यात आली. या ठिकाणी कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील मान्यवरांनी  छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा गायला. यानंतर पालखी पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त डॉ.निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण

ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले. सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निनादले.  नाशिक येथील वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.