तहसिलदार राहुल गायकवाड यांना जिल्हाधिकारीनी बजावली नोटीस

वैजापूर ,१९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीच्या अनुदान वाटप करताना  लाखो रूपयांचा घोळ झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे घोटाळ्याकडे दुर्लक्ष करून बेजबाबदार पणा केल्याबद्दल वैजापूरचे तहसिलदार चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून त्यांना जिल्हाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजवून सात दिवसाचे अल्टीमेटम दिले आहे.त्यामुळे घोटाळ्यात सहभागी असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

तालुक्यात 2019 यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात दोनदा अतिवृष्टी झाली होती.या अतीवृष्टी मुळे शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले होते.एकाच वर्षात दोन महिने लागोपाठ अतीवृष्टी झाल्याने एका शेतकऱ्याला एकदाच अनुदान देण्याचे शासनाचे निर्देश होते.परंतु तालुक्यातील डोणगाव येथे कृषी अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांच्या त्रिसदस्यीय समीतीने मनमानीपणे पंचनामे करून स्वतःच्या मर्जीतील काही शेतकऱ्यांना दोनदा अनुदान मंजूर केले.डोणगाव येथे 50 शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने अनुदान मंजूर केल्याने शासनाचे नुकसान झाले.परंतु गावातील प्रकाश डोखे यांनी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे 26 मे 2022 केली होती.आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली होती.त्यांनी 11 नोव्हेंबर 22 रोजी चौकशी करून अहवाल सादर केला होता.या अहवालानुसार 50 शेतकऱ्यांना जास्तीचे अनुदान वाटप त्रिसदस्यीय समीतीने केले आहे.यातील 12 शेतकऱ्यांचे अनुदान रोखण्यात आले.मात्र 38 शेतकऱ्यांना एक लाख 95 हजार 856 इतके अनुदान जास्तीचे वाटप झाल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न झाले.मात्र या बाबींकडे तहसिलदार राहुल गायकवाड यांनी दुर्लक्ष केले.त्रिसदस्य समिती वर तहसिलदार यांचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले.त्यांची ही कृती अत्यंत बेजबाबदार पणाची व पदाला अशोभनीय असल्याचे नोटीसमध्ये  नमुद करण्यात आले आहे.तसेच त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ही त्यांचेवर ठेवण्यात आला आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तहसिलदार राहुल गायकवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून आपले विरूद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये.याबाबत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.