नांदूर मधमेश्वर कालव्याला 400 क्यूसेसने तर पालखेड धरणातून डाव्या कालव्याला 80 क्यूसेस ने पाणी सोडले

पालखेडचे पाणी नारंगी धरणात येण्यास सुरुवात
जफर ए.खान 

वैजापूर,२३ जुलै :-  पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणात मोठा पाणीसाठा उपलब्ध झाला असून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत पाणी सोडण्यात आलेले आहे. वैजापूर तालुक्यात कमी पाऊस असल्याने ओव्हर फ्लोचे पाणी नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात 400 क्यूसेसने तसेच पालखेड धरणांतून डाव्या कालव्याद्वारे 80 क्यूसेस पाणी शहरालगतच्या नारंगी धरणात सोडण्यात सोडण्यात आले आहे.  नांदूर मधमेश्वर कालव्याला व पालखेड धरणांतून डाव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला असला तरी तालुक्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. पाऊस कमी असल्यामुळे तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची स्थिती चिंताजनक असून सद्यस्थितीत अर्धा टीएमसी साठवण क्षमतेच्या नारंगी मध्यम प्रकल्पात 09.81 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

पालखेड धरणाचे ओव्हर फ्लोचे पाणी डाव्या कालव्याद्वारे शहरालगतच्या नारंगी धरणात सोडल्यास शहरासह आसपासच्या चौदा-पंधरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटतो.नाशिक जिल्ह्यातील धरणांतील ओव्हर फ्लोचे पाणी नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात तसेच पालखेड धरणांतून नारंगी धरणात सोडण्यात यावे अशी मागणी आ. रमेश पाटील बोरणारे व मा.नगराध्यक्ष साबेर खान व कालवा सल्लागार समितीचे सदस्य बाबासाहेब पाटील जगताप यांनी  पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीनुसार नांदूर मधमेश्वर कालव्यात काल दुपारी 400 क्यूसेसने तर पालखेड धरणातून 80 क्यूसेस पाणी डाव्या कालव्याद्वारे नारंगी धरणात सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्यात आल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.