महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही: उद्धव ठाकरे यांचा ओपन जिपमधून आव्हान

उद्धव ठाकरेंचे  बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल

मुंबई ,१८ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दोन्ही काढून टाकले आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत उद्धव गटाची बैठक सुरू आहे. आमदार-खासदार मातोश्रीवर पोहोचले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या गेटवर ओपन जीपमधून कार्यकर्त्यांना संबोधित केले.

आजही ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या समर्थकांशी बोलण्यासाठी उद्धव यांनी कलानगरच्या चौकात आले. त्यांनी ओपन जीपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणूक आयोगाचे आयुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच भारतीय जनता पार्टीवरही टीका केली. उद्धव ठाकरेंच्या भाषणादरम्यान कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत होते. ‘आदेश… साहेब आदेश…’ असं अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भाषणादरम्यान ओरडत होते. ‘उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘उद्धव ठाकरे अंगार है बाकी सब भंगार है’ अशा घोषणाबाजीही कार्यकर्त्यांनी केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
महाशिवरात्रीच्या दिवशी आमचे धनुष्यबाण चोरीला गेले. ज्यांनी धनुष्यबाण चोरले त्यांनी मधमाशांच्या पोळ्या वर दगड मारला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारांना बाळासाहेबांचा चेहरा हवा आहे पण ठाकरे कुटुंबाचा नाही. पुन्हा भगवा फडकल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोग हा मोदींचा गुलाम आहे. मी थकलो नाही, मी खचणार नाही. शिवसेना संपवता येणार नाही. हे रणशिंग फुंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीचा वापर केला आहे. १९६९ मध्ये बाळासाहेबांनी गाडीच्या बोनेटवर उभे राहून भाषण केले होते. त्याच पावलावर पाऊल ठेवत आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

image.png

उद्धव यांनी, “माझा चेहरा कसा होता आणि ज्याच्या हातात धनुष्यबाण होता त्याचा चेहरा कसा होता. ज्याच्या हातात धनुष्यबाण होता त्याच्या गळ्यात मी चोर आहे अशी पाटी लावल्यासारखा त्याचा चेहरा होता. ही चोरी त्याला पचवू द्यायची नाही,” असा टोला मुख्यमंत्री शिंदेंचं थेट नाव न घेता लगावला.

“मी खचलेलो नाही…”

“धनुष्यबाण पेलायला सुद्धा मर्द लागतो. रावणाने सुद्धा शिव धनुष्य पेलायचा प्रयत्न केला होता पण काय झालं उताना पडला. चोर आणि चोरबाजाराचे मालक हा शिव धनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचप्रमाणे “मी खचलेलो नाही. मी खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या तकदीच्या जोरावर उभा आहे. ही ताकद माझ्यासोबत आहे तोपर्यंत असे कितीही चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्यांना सगळ्यांना निवडणुकीमध्ये गाडून हा शिवरायांचा भगवा त्यांच्या छाताडावर फडकवण्याची ताकद आमच्या मनगटामध्ये आहे,” असे म्हणत उद्धव यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहा असे  सांगितले .

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळाल्यानंतर शनिवारी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. कारच्या छपराबाहेर येत उद्धव ठाकरेंनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि भाजपला दिलं. उद्धव ठाकरे भाषण करत असताना मातोश्रीबाहेर रस्त्यावर आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, भास्कर जाधव, सुषमा अंधारे आणि प्रियांका चतुर्वेदी हे नेते आणि शिवसैनिक उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंनी कारच्या छपराबाहेर येऊन भाषण केलं, त्यामुळे अनेकांना बाळासाहेब ठाकरे यांनी ५५ वर्षांपूर्वी केलेल्या भाषणाची आठवण झाली. बाळासाहेब ठाकरे यांनीही अशाचप्रकारे कारच्या बोनेटवर उभं राहून शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. बाळासाहेबांचा कारच्या बोनेटवर उभे  राहून भाषण करतानाचा फोटो अनेकवेळा व्हायरल होतो. ३० ऑक्टोबर १९६८ मध्ये  मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया भागात बाळासाहेबांनी गाडीच्या बोनेटवर उभे  राहून भाषण केल्याचे शिवसैनिक सांगतात.