दुसऱ्या कंपनीचा बंद मोबाईल ग्राहकाला देणाऱ्या डी.जे.मोबाईल स्टोअरला ग्राहक तक्रार आयोगाने दिला दणका

औरंगाबाद,१२फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  ऑर्डर दिलेल्या मोबाईल  ऐवजी दुसऱ्या कंपनीचा बंद मोबाईल ग्राहकाला देणाऱ्या  डी.जे स्‍टोर मोबाइल स्टोअर या ऑनलाईन कंपनीला औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाने चांगलाच दणका दिला. कंपनीला मोबाईलचे ३० हजार रुपये सहा टक्के व्‍याजासह देण्‍याचे तसेच तक्रारीपोटी २५०० रुपये बँक डीडी स्‍वरुपात देण्‍याचे आदेश देखील आयोगाच्‍या अध्‍यक्षा स्मिता कुलकर्णी आणि सदस्य संध्‍या बारलिंगे यांनी दिले.

ज्ञानेश्‍वर काशिनाथ आदमाने (रा. हनुमाननगर, गारखेडा परिसर) यांनी ऑनलाईन बेवसाईट व्‍दारे सॅमसंग कंपनीचा मोबाइल बुक केला होता. त्‍यासाठी त्‍यांनी हरीश लकमत खान (रा. मालवानी, मालाड वेस्‍ट, मुंबई) याच्‍या डी.जे मोबाइल स्‍टोअर या ऑनलाईन स्‍टोअरला ३० हजार रुपये देखील अदा केले होते. डी.जे स्‍टोअरमधून त्‍यांना एक पार्सल पाठविले. मात्र त्‍यात बुक केलेल्या मोबाइल ऐवजी दुसऱ्याच कंपनीचा मोबाइल देण्‍यात आला. याप्रकरणात आदमाने यांनी सातारा आणि सायबर पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली. तेव्‍हा स्‍टोअरच्‍या मालकाने पैसे परत करण्‍याचे आश्‍वासन दिले. त्‍यानंतर मात्र स्‍टोअरच्‍या मालकाने कोणतीही रक्कम परत केली नाही. त्‍यामुळे आदमाने यांनी अॅड. प्रकाश उंटवाल आणि अॅड. जि.के. बोरुडे यांच्‍यावतीने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली होती.