वैजापूर तालुक्यातील 25 गावांना ट्रॉन्सफॉर्मरसाठी एक कोटी रुपये मंजूर

आ. बोरणारे यांच्या प्रयत्नाला यश ; शेतकऱ्यांना दिलासा

वैजापूर ,१२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- जास्तीचा विद्युत भार असणाऱ्या वैजापूर तालुक्यातील 25 गावांसाठी नवीन शंभरचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आ. रमेश पाटील बोरणारे यांनी आठच दिवसांत हा निधी मंजूर करून आणला असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

वैजापूर तालुक्यातील जवळपास 50 गावांतील शेतकऱ्यांनी आमदार रमेश पाटील बोरणारे यांची भेट घेऊन नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी व ज्या ठिकाणी जास्त लोड आहे तिथे शंभरचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा अशी मागणी केली होती.  शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार बोरणारे यांनी तालुक्यातील 25 गावांत नवीन शंभरचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. यामध्ये करंजगाव, लासुरगांव, मणूर, शिऊर, कोल्ही, खंडाळा  कापुसवाडगाव, बिलोणी, लाखखंडाळा, पालखेड, धोंदलगाव, कापूसवाडगांव या गावांसह 25 गावांचा समावेश आहे. तालुक्यातील धोंदलगाव व  कापूसवाडगाव येथे आज तीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले. नवीन बसविण्यात आलेल्या या  ट्रान्सफॉर्मरचे उदघाटन आमदार बोरणारे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील  सोनवणे (कन्नड), बाबासाहेब पाटील जगताप ( वैजापूर), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे  संचालक रामहरीबापू जाधव, उपजिल्हाप्रमुख भरत कदम  शहरप्रमुख पारस घाटे,  कैलास आवारे, नरेन्द्र सरोवर, यांच्यासह  शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.