महावितरणमध्ये लसीकरण मोहिमेस प्रारंभ

औरंगाबाद,२०एप्रिल /प्रतिनिधी 

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांच्या निर्देशानुसार औरंगाबाद परिमंडल कार्यालयात महानगरपालिकेच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.  मंगळवारी (२० एप्रिल) आयोजित शिबिरात ७० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.   

महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अखंडपणे राबत आहेत. त्यासाठी त्यांना सातत्याने घराबाहेर फिल्डवर कार्यरत रहावे लागते. यातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी लस घ्यावी, यासाठी महावितरण प्रशासन प्रयत्न करत आहे. महावितरणच्या सर्व अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.गिते यांनी केलेले आहे. त्यानुसार मंगळवारी आयोजित शिबिराचे उद्घाटन प्रभारी मुख्य अभियंता संजय आकोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अधीक्षक अभियंता संजय सरग, उपमहाव्यवस्थापक प्रवीण बागूल, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता दीपक सोनोने, प्रेमसिंग राजपूत, मकरंद कुलकर्णी उपस्थित होते. शिबिरात महावितरणच्या विविध कार्यालयांतील ७० कर्मचाऱ्यांनी लस घेतली. सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.गिते यांनी शिबिरास भेट देऊन कर्मचाऱ्यांना लस घेण्यास प्रोत्साहित केले आणि त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.    

महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.आसरा पटेल, डॉ.नीतेशकुमार नंदागवळी, परिचारिका मोनिका भटकर, आशा स्वयंसेविका करुणा जोशी, शिक्षक शहबाज शेख, सुजाता इंगळे, रेखा बनसोडे, टास्क फोर्स सदस्य सागर सोनोने यांनी लसीकरणासाठी सहकार्य केले. महावितरणच्या वतीने उपव्यवस्थापक संजय खाडे, प्रमुख लिपिक प्रकाश जगताप, निमनस्तर लिपिक किशोर वाघ, हारुण शेख, सागर अग्रवाल यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.