‘तुम्ही मोदींचा फोटो तर आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो, होऊ द्या आमने-सामने’ उद्धव ठाकरेंचे खुले  आव्हान

मुंबई ,२३ जानेवारी  / प्रतिनिधी :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ठाकरे गटाकडून षन्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. त्यांच्याबरोबर पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. यावेळी भाषण करतानना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

‘गद्दार विकले जाऊ शकतात’
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा पुन्हा एकदा गद्दार असा उल्लेख केला. गद्दार खोक्याने विकले जाऊ शकतात , पण ही गर्दी विकत घेणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भाजपात किंवा मिंदे गटात गेले तर आश्चर्य वाटायला नको असा टोला त्यांनी यावेळी लगावला. प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. आज दोन्ही वारसांचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

हिंदुत्वाच्या आधारावर धोक्याची भिंत उभी करायची आणि त्याच्या आडून एक पोलादी पक्कड घट्ट बसवायची, कि तुम्ही हू की चू केली की याद राखा. चीनमध्ये सरकारविरुद्ध बोललं तर तो दोन दिवसात गायब होतो, तशीच परिस्थिती इथे आणायला बघतायत असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावरही निशाणा साधला.

कार्यक्रमाला का उपस्थित राहिले नाहीत?
विधानभवनामध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावर कार्यक्रमाला उपस्थिती का लावली नाही याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. 
मला तैलचित्राबद्दल विचारलं, मी सांगितलं ते तैलचित्र मी बघितलं नाही, कलाकारांचं मला अपमान करायचा नाही, पण या कलाकारांना वेळ दिला गेला आहे का हे त्यांना विचारलं पाहिजे, घाईगडबडीने काही तरी चितारायचं आणि सांगायचे हे तुझे वडिल हे मान्य नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. एकिकडे सांगायचं शिवेसनाप्रमुखांचे विचार, तिकडे मोदी का आदमी आणि काल म्हणाले शरद पवार गोड माणूस नक्की कोणाचे फोटो लावणार तुम्ही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. 

मुख्यमंत्री शिंदे यांना टोला
मविआ सरकार का पडलं तर हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले म्हणून काही लोकं बाहेर गेले. पण काल हेच लोकं सांगतायत शरद पवार खूप गोड माणूस आहे. मी फोनवरुन त्यांचं मार्गदर्शन घेत असतो, मग मी काय घेत होतो, अशी माणसं आहेत सगळी असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला. बाळासाहेबांचं तैलचित्र लावताय, आनंद आहे, पण त्यामागचा तुमचा हेतू वाईट आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. वारसा हडपण्याचा हा डाव असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.