‘मराठीसाठी बाळासाहेबांची सत्तेला लाथ’, राज ठाकरेंनी सांगितला सुरेश जैन यांचा तो किस्सा

मुंबई ,२३ जानेवारी  / प्रतिनिधी :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला बाळासाहेबांचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गैरहजर होते. मात्र या कार्यक्रमात बाळासाहेबांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरेंनी या प्रसंगी केलेलं भाषण चांगलेच गाजले. बाळासाहेबांच्या आठवणी सांगतानाच त्यांनी मराठीसाठी बाळासाहेब किती आग्रही होते आणि त्यांनी कशाप्रकारे मराठीसाठी सत्तेला लाथ मारली याबद्दलचा एक प्रसंग सांगितला.

जवळपास तीन-सव्वातीन वर्षांनी विधानभवनात आणि मुंबईच्या रस्त्यांवर बाळासाहेबांच्या नावाच्या आधी हिंदू हृदय सम्राट असं लावण्यात आल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तसंच उद्धव ठाकरे यांच्या गैरहजेरीबाबतही राज ठाकरे अप्रत्यक्षपणे बोलले. इकडे उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या… असं म्हणत राज ठाकरेंनी शाब्दिक कोटी केली.

“तीन-सव्वातीन वर्षानंतर बाळासाहेबांच्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट लागलं”

त्यानंतर राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला टोला लगावला. “आज तीन-सव्वातीन वर्षानंतर होर्डींगवर बाळासाहेबांच्या नावाआधी हिंदुहृदयसम्राट असं दिसतंय. राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन,” असं राज यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “उपस्थित असलेले, नसलेले” असं म्हणतही सूचक विधान केलं. ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला ही इमारत बघायला मिळाली. ज्या माणसामुळे शेकड्याने लोक इथं आले आणि अनेकांना त्यांनी इथं पाठवलं, असं म्हणत बाळासाहेबांच्या योगदानाचा आढावा घेतला. तसेच, “एक विधानसभेत असावं एक विधानपरिषदेत असावं म्हणजे लोकांना कळेल आपण कोणामुळे इथं आलो,” असंही राज म्हणाले.

मला स्वत: ते गाडीने घ्यायला यायचे

“मला मिळालेला कडेवारचा सहवास आहे. बोट पकडून चालायचा सहवास आहे. व्यंगचित्रांचा सहवास आहे. सुरुवात कुठून करायचं कळत नाही,” असं म्हणत राज ठाकरेंनी बाळासाहेबांबद्दलच्या अनेक आठवणी आहेत पण कोणत्या सांगाव्यात कळत नाही  असंही म्हटलं. “शिशू वर्गात असताना बाळासाहेब स्वत: गाडी चालवत मला घ्यायाला यायचे. विविध अंग मी एका माणसात लहानपणापासून पाहत होतो. मी मध्यंतरी म्हटलं होतं ना वारसा हा वास्तूचा नसतो विचारांचा असतो. जर मी काही जपलं असेल तर तो विचारांचा वारसा जपला आहे. मला ह्यूमर किंवा विनोद म्हणून काही गोष्टी सांगता येणार नाही. मात्र ही व्यक्ती कोणत्या गोष्टीमध्ये मुलायम होती, कडवट होती मला ठाऊक आहे,” असं राज म्हणाले.

कडवट मराठीपण अनुभवलं

“कोणी माणूस संस्कार करत नसतो. कृती होत असताना ते वेचायचे असतात. ते वेचत गेलो मी. अत्यंत कडवट मराठी आहे मी. माझा जन्म एका हिंदुत्ववादी घरात झाला आहे. कडवट मराठीपण अनुभवायला मिळालं, पहायला मिळालं. हा माणूस आत एक बाहेर एक असं कधीच नव्हतं,” असं सांगताना राज ठाकरेंनी एक आठवण सांगितली.

बाळासाहेब झोपले होते अन्…

“1999 साली राणे मुख्यमंत्री होते. तेव्हा जी निवडणूक झाली. गोपीनाथरावजी मुंडे होते. शिवसेना-भाजपा युती मुख्यमंत्रीपदावर अडकली होती. १५-२० दिवस आमदारांवरुन वाद सुरु होता. मातोश्रीत मी बसलो होतो अचानक दोन गाड्या आल्या. पुण्याचे प्रकाश जावडेकर आणि भाजपाचे दोन चार जण गाडीमधून बाहेर आले. मला म्हणाले बाळासाहेबांना भेटायचं आहे. मी म्हटलं ते झोपलेत. आता काही भेटणार नाही. त्यांची झोपायची वेळ आहे वगैरे. आज आपलं सरकार बसतंय त्यामुळे थोडं अर्जंट भेटायचं आहे, असं त्यांनी मला सांगितलं. एक निरोप तरी द्या आम्ही खाली थांबतो,” असं आलेल्या लोकांनी मला सांगितल्याचं राज म्हणाले.

“मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली”

“मी निरोप देतो असं सांगितल्यानंतर त्या लोकांनी, सुरेशदादा जैन हे युतीचे मुख्यमंत्री असतील. ते आमदार खेचून आणतील काही करुन आणतील मग आपलं सरकार होईल,” असा निरोप दिल्याची आठवण राज ठाकरेंनी सांगितलं. “मी वरती गेलो काळोख होता शांतता होती. आम्ही एकेरीमध्ये बोलायचो. मी म्हटलं ए काका उठ. म्हटलं ए काका उठ. ते वळले म्हटले काय रे? जावडेकर वगैरे मंडळी आलीयत ते आजच्या आज सरकार बसेल असं सांगत आहेत. सुरेश जैन मुख्यमंत्री असतील असं त्यांनी सांगितलं आहे, असं मी त्यांना म्हणालो. त्यांनी (बाळासाहेबांनी) माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल. दुसरा कोणी बसणार नाही. त्यानंतर ते पुन्हा वळले आणि झोपले,” असं राज म्हणाले. “मला त्या दिवशी कळलं या माणसाने मराठीसाठी सत्तेला लाथ मारली. मराठीसाठी गोडपणा, हिंदुत्वासाठी कडवटपणा, असे होते बाळासाहेब,” असंही राज यांनी म्हटलं.

बाबरी पाडली तेव्हा…

“बाबारी पडली तेव्हा मी असाच खाली बसलो होतो. संध्याकाळच्या बातम्यांमधून याबद्दल कळलं. त्यानंतर दीड-दोन तासांनी एक फोन आला. एका वृत्तपत्रामधून फोन होता. इथे कोणी सुंदरलाल भंडारी म्हणतात ही आम्ही केलेली गोष्ट नाही. ती कदाचित शिवसैनिकांनी केलेली असेल. बाळासाहेब त्यावेळी म्हणाले, ते जर माझे शिवसैनिक असतील तर मला अभिमान वाटतोय. त्यावेळी अशाप्रकारे कोणीतरी जबाबदारी घेणं आवश्यक होतं,” असं राज यांनी म्हटलं. “असे अनेक प्रसंग आमच्या घरात घडले आहेत. तो माणूस कठोर होता तेवढाच साधा होता. त्यांचे विनोद म्हणजे काही काही तर सांगता पण येणार नाही,” असं म्हणत राज हसले. 

…म्हणून मी पक्ष काढू शकलो

“मी अनेक पराभव झालेले लोक यायचे त्यांना संभाळणारे, जिंकलेल्यांशी बोलणारे बाळासाहेब. एक विलक्षण व्यक्तीमत्वं मी पाहत आलो. मी लहानपणापासून मी त्यांच्याबरोबर गोष्टी पाहून शकलो म्हणून मी स्वत:चा एक राजकीय पक्ष पाहू शकतो. यश आलं तर हुरळूत जात नाही आणि पराभव झाला तर खचून जात नाही,” असंही राज म्हणाले.