भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही-खा. शरद पवार

आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नाही

कोल्हापूर , ८ जानेवारी  / प्रतिनिधी :- आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नाही. २०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट एकत्र तयारी करत आहोत. एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरु आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी  मांडली.

सत्ता हातात असल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचे असते. पण मी आता बघतो की, सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची विधान याला तुरुंगात टाकेल, यांचा जामीन रद्द करेल वगैरे वगैरे अशी भाषा करत आहेत. हे खरं राजकीय लोकांचे काम नाही. परंतु या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे, अशी टीका पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात फिरलो आहे. शिवसेनेत दोन गट पडले हे खरं आहे. मात्र कडवा शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच आहे. उद्या निवडणूक झाल्या की समाजाच्या त्यांच्याबद्दल भावना निश्चितच कळून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले. महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना आबाधित ठेवली. हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते. ते सतत चुकीची वक्तव्ये करतात. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे चांगलं नाही. शेवटी हे महत्त्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही, असे ते म्हणाले.

खासदार शरद पवार काय म्हणाले 

सीमाप्रश्नासंबंधी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत कोर्टात आपल्या राज्याची बाजू नीट मांडण्यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. येत्या १५ दिवसांत ही केस सुरू झाली आणि ती अंतिम निर्णयापर्यंत आली तर ही आपल्या सर्वांसाठी समाधानाची बाब असेल. अंतिम निर्णय घेयचा असेल तर सीमावासियांचे म्हणणे त्याठिकाणी योग्य पद्धतीने मांडले गेले पाहिजे, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. हरिश साळवे यांची नेमणूक या केससाठी करावी, त्यासाठी प्रयत्न करावे असेही या बैठकीत ठरवण्यात आले.

राहुल गांधींविषयी सत्ताधारी भाजपने कायमच टिंगलटवाळी केली. मात्र राहुल यांनी भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम हाती घेतली. त्यावरही सुरुवातीला टीका झाली. मात्र हा कार्यक्रमात केवळ काँग्रेस पक्षाचाच आहे, असं काही मर्यादित ठेवलं नाही. सर्व पक्ष या यात्रेत सामील झाले. महात्मा गांधींच्या विचारांनी काम करणाऱ्या संस्था यात सामील झाल्या होत्या. विशेष म्हणजे, भारत जोडो यात्रेत सामान्य माणूस देखील पोहोचला होता. यात्रेला सामान्यांची सहानुभूती होती. राहुल गांधी यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दूषित करण्याचा प्रयत्न भाजपाने केला त्याला या पदयात्रेने प्रत्युत्तर दिले आहे. सर्व विरोधकांमध्ये एक वाक्यता होयला या पदयात्रेचीही मदत होईल.

राम मंदिराचे काम पूर्ण कधी होणार, याची घोषणा एखाद्या पुजाऱ्याने करायला हवी होती. परंतु, ती घोषणा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केली. सामान्य नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांवरुन लक्ष्य विचलित करण्यासाठीच अशा प्रकारचे विषय काढले जातात.

राज ठाकरे काही आरोप करू शकतात. राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष कोण होते त्याची यादी बघितली तर. पहिले छगन भुजबळ होते. नंतर काळात मधुकर पिचड होते. ते आदिवासी समाजचे होते. अनेक लोकं होते. ते कोणत्या समाजाचे होते सर्वांना माहीत आहे. ती नावे सांगायची गरज नाही, जातीचा विषय आमच्या मनात येत नाही. आम्ही सर्व शाहू फुले आंबेडकरी विचाराचे लोक आहोत. त्यामुळे कोणी काही टीका केली तर आम्ही त्याची दखल घेत नाही.

बिहार भाजप विरोध डावलून नितेश कुमार यांनी जातीय आधारित जनगणना सुरू केली. अशी जनगणना केली जावी ही मागणी आम्हा सर्वांची अनेक वर्षे आहे. त्यांच्या समाजाचा लहान घटक आहे, त्याची संख्या किती, त्याची स्थिती काय आहे या गोष्टी लक्षात येतात. अशा घटकांना वर आणण्यासाठी काही वेगळे कार्यक्रम घेतले पाहिजे. त्यासाठी जनगणना आवश्यक आहे. हा विचार आम्ही सातत्याने मांडला आहे.