स्वाभिमानाने केलेला एक्झिट कधीही बरा;लोकांच्या मनातले राजकारण आपल्याला करायला आवडेल- पंकजा मुंडे

नाशिक, ८ जानेवारी  / प्रतिनिधी :- राजकारणात जे बोलतो तसेच वागलो, तर लोकांचे वलय आपल्यापासून कोणीही हिरावू शकत नाही.राजकारणातील वादळाला कदापीही सरेंडर होऊ नका. काही मिळविण्यासाठी झुकू नये, हाच बाणा राजकीय व्यक्तीने ठेवणे गरजेचे आहे. राजकारणात अनेक संकटे येतात.मात्र ,अशावेळी महाभारतातील भीष्म पितामह यांच्यासारखी भूमिका आपल्याला वठवायला आवडेल. यासाठी लोकांच्या मनातले राजकारण आपल्याला करायला आवडेल असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्स,नाशिकतर्फे रविवारी (दि.८) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक सभागृहात.त्यावेळी त्या बोलत होत्या.

‘संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उघडपणे आपली नाराजी जाहीर केली आहे. पंकजा मुडे राजकारणातून बाहेर पडणार का? अशी चर्चा त्यांच्या या वक्तव्यामुळे रंगली आहे. ‘संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. मला संधी का देत नाही, याचं उत्तर संधी न देणा-यांना विचारा, अशी सूचक नाराजी देखील त्यांनी बोलून दाखवली. 

यावेळी पंकजा मुंडे यांच्या हस्ते वंजारी युवा सन्मान पुरस्काराचे वितरण झाले.अध्यक्षस्थानी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा माजी अध्यक्ष अॅड. सुधाकर आव्हाड होते.

त्या म्हणाल्या, मला लिखाणाची आवड असून राजकारणाबरोबरच लेखक व्हायला आवडले असते. मला अनुभवाच्या मालिका व अनुभव लिहायचे आहे. राजकारणातील मॅनेजमेंट हे वेगळे असते.यापुढे महिलांना मॅनेजमेंट करताना पाहायला आवडेल. राजकीय व्यक्तीने जे बोलतो तेच केले तर लोकांचे वलय आपल्यापासून कोणीही हिरावू शकत नाही.

‘झुकेगा नही साला’ हा बाणा त्रास देणारा ठरला का? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या,मोठी व्यक्ती असेल तर त्याच्यासमोर झुकलेच पाहिजे. हा आपला संस्कार आहे.मला मुंडे साहेबांनी झुकणार नाही,वाकणार नाही,मोडणार नाही ,असे सांगितले आहे. तेच रक्त माझ्या व आपणा सर्वांमध्ये आहे. राजकारणात संकटे येतात.त्यावर चक्रव्यूहातील अभिमन्युसारखी की, संधी न मिळालेल्या कर्नासारखी आपली भूमिका आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या, यापेक्षा मला महाभारतातील भीष्म पितामह यांचे पात्र वठवायला आवडेल. आपल्यात संयम आत्मविश्वास आहे. संयमाने अनुभव पचवता येतो. त्यामुळे संयम ढळू देऊ नये,विजय मिळवण्यासाठी संयम आणि सातत्य हे विद्यार्थ्यांनी कायम ठेवणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.

आपल्याला काय राहून गेले असे वाटते? कशामध्ये खंत वाटते?

यावर मुंडे म्हणाल्या की, मला मॅनेजमेंट मास्टर करायचे राहून गेले.राजकारणात तर बरेच राहून गेले आहे. ते मिळविण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. राजकारणातून बाहेर पडण्याची भीती मला कदापी वाटत नाही. कारण जनतेच्या नजरेतून उतरणारच नाही, असे काम मी करत आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे मी एका उंचीवर गेल्याचे त्यांनी सांगितले.

स्वर्गीय मुंडे साहेबांशी जर आपल्याला बोलायचे असेल तर आपण काय बोलाल?

यावर बोलताना मुंडे म्हणाल्या, सेवा करायची संधी साहेबांनी आम्हाला द्यायला हवी होती. त्यांना रक्ताची गरज पडली असती तर रक्तदात्यांचा जगात विक्रम झाला असता. लोकांसाठी जीव देणाऱ्या साहेबांनी असे जीव सोडून जायला नको होते.असे सांगताना त्यांना दाटून आले.