भाजपला मोठा झटका! नांदेडचे माजी खासदार, आमदाराची काँग्रेसमध्ये घरवापसी!

नांदेड ,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यात भाजपाला खिंडार पडलंय. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपातील दुफळी उघड झालीय. भाजपाच्या एका माजी मंत्री व ज्येष्ठ नेत्यासह माजी आमदार आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत काँग्रेस प्रवेशाची घोषणा केलीय.देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वीच खतगावकर काँग्रेसमध्ये गेल्यानं भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे भाऊजी असलेले भास्करराव पाटील खतगावकर यांनी 7 वर्षापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णाही भाजपवासी झाले होते. पण या दोन्ही नेत्यांना भाजपमध्ये योग्य स्थान आणि सन्मान मिळत नसल्यानं ते नाराज होते. अशोक चव्हाण यांना आपल्या भाऊजींचे मन वळवण्यात अखेर यश आलं आहे. त्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर आणि ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपला रामराम ठोकत असल्याचं जाहीर केलंय.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्याने जेष्ठ नेते भास्करराव खतगावकर नाराज होते. अखेर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे रविवारी जाहीर केले.देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत खतगावकर यांना विश्वासात न घेता भाजपनं उमेदवार दिला. त्यामुळे खतगावकर आणि पोकर्णा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं जाणकार सांगत आहेत. खतगावकर यांची देगलूर मतदारसंघात पकड असल्यानं ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून खतगावकर भाजप नेत्यांवर नाराज होते. सुभाष साबणे यांना उमेदवारी दिल्यानंतर होणाऱ्या प्रचार सभांना विविध कारणे देऊन खतगावकरांनी जाणे टाळले होते. पहिल्या सभेला दाढदुखीचे कारण देत खतगावकर सभेला गैरहजर राहिले. त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये जात असल्याचं स्पष्ट झालं.