अंमली पदार्थ विक्रीवर प्रतिबंधात्मक कारवाईसह जाणीव जागृती करण्यात येणार-पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया

औरंगाबाद,२८ डिसेंबर / प्रतिनिधी :-औषध विक्री केंद्र चालकांनी अंमली पदार्थचा अंश असणाऱ्या औषधांची विक्री करताना रुग्णांचे आधारकार्ड आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या चिठ्ठीची खातरजमा करुन विक्री करावी. तसेच समितीच्या माध्यमातून जाणीव जागृती  करण्याचे निर्देश जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत पोलिस अधीक्षक  मनीष कलवानीया  यांनी दिले.

            या बैठकीस राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ.जगदीश टेकाळे,  भारतीय डाक विभागाचे सहायक अधीक्षक संजय ताठे, कृषी विभागाचे उपसंचालक डी.एम.दिवटे, अन्न व औषध प्रशासनाचे काळेश्वर, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास आदि समिती सदस्य उपस्थित होते.

            नागरिकात व्यसनाधिनता वाढू नये यासाठी जिल्हास्तरीय  समितीच्या माध्यमातून अंमली पदार्थाच्या विक्रीला प्रतिबंध करण्याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य खबरदारी पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन घेत आहे. यासाठी औषधी विक्री करणाऱ्या विक्री केंद्रावर भेटी देवून अहवाल मागविण्यात येत असल्याचे ही ते म्हणाले.

             कृषि अधिकाऱ्यामार्फत  शेतीतील आंतरपिकात गांजा किंवा तत्सम पिकांची लागवडी संदर्भात अहवाल मागविण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक  यांनी कृषि विभागाला दिले.  समाजात व्यसनधिनता वाढू नये म्हणून जाणीवजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत समपुदेशनासाठी राज्य शासनाने 14416 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले  याबरोबरच 104 या हेल्पलाईन वरदेखील नागरिकांना मानसिक आरोग्य व इतर आजारावरील समुपदेशन आणि मदत केली जाते. शाळा, महविद्यालयामध्ये चित्रकला, निबंध स्पर्धा, तज्ज्ञ व्यक्तीच्या मागदर्शनपर मुलाखती,व्याख्याने, हे समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. या उपक्रमातून व्यसनांचे दुष्परिणाम, आर्थिक नुकसान व व्यसनधीनता दूर करण्यासाठी मार्गदर्शन  विविध प्रसार माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येणार असल्याचे कलवानीया यांनी सांगितले.