गारज येथे शिवना टाकळी प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यासंदर्भात आढावा बैठक

वैजापूर,२४ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील गारज येथे आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली शिवणा टाकळी मध्यम प्रकल्प कालवा रब्बी हंगाम आवर्तन सोडण्याविषयी आढावा बैठक शनिवारी (ता.24) संपन्न झाली.

रब्बी हंगाम पिकांना आवर्तन सोडण्यासाठी शिवना टाकळी मध्यम प्रकल्प ओलीताखाली गावातील शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्याने    आज गारज येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार किमान दोन आवर्तन सोडणे गरजेचे असून 10 जानेवारीपर्यंत सर्व वितरिका दुरूस्ती करून 10 ते 15 जानेवारी दरम्यान पहिले रोटेशन सोडावे.  पहिले रोटेशन हे जास्तीचे निदान 25 ते 30 दिवसाचे तरी असावे. त्यामुळे कोणालाही पाणी कमी पडणार नाही. दुसरे रोटेशन 10 ते 15 मार्चला असे रब्बीचे एक व उन्हाळी एक असे एकुण दोन आवर्तन सोडण्यात यावे असे निर्देश आमदार बोरणारे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने संबधित अधिकाऱ्यांना दिले. 

कालव्याच्या वितरिकासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अनेक वर्षांपासून संपादित केल्या आहेत. त्या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही.  तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा अशी सूचनाही आमदार बोरणारे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिली.तसेच शेतकऱ्यांनी पाण्याची  मागणी करणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी वेळेत व जास्तीत जास्त मागणीच्या बाबतीत सक्रिय असले पाहिजे असे आमदार बोरणारे यावेळी म्हणाले.

या प्रसंगी कार्यकारी अभियंता गोडसे, श्री.कडवे, अशपाक, शहरप्रमुख राजेंद्र साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य नारायणराव भोपळे, उपतालुकाप्रमुख पी. एस. कदम, कनिष्ठ अभियंता व्यवहारे, विभागप्रमुख प्रभाकर जाधव, सुरेश पानसरे, सरपंच विलास काका, उपसरपंच दशरथ पाटील सरोवर, राधू अण्णा सरोवर, बाळासाहेब पाटील भोसले, रावसाहेब  वाघ, कैलास आवारे, पांडुरंग बोरकर, बाळासाहेब  चेळेकर, अण्णासाहेब डमाळे, बाबासाहेब दरेकर, गोरख चव्हाण, नरेंद्र सरोवर, सुनिल जाधव, सुदाम  गोरे, किरण सरोवर, अशोक शेळके यांच्यासह संबंधीत अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.