वैजापुरात चहाचे बिलावरून दोन गटात वाद ; मारहाणीत तीन जण जखमी

दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माजी  नगराध्यक्ष साबेर खान यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक

वैजापूर ,​९​ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील खान गल्ली या मध्यवर्ती भागात सोमवारी रात्री चहाचे बील देण्याच्या किरकोळ कारणावरुन एका गटाने तिघांवर दगड विटांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व गैरकायद्याची मंडळी जमवून दंगल करण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला. 

या घटनेत तालेब शाह, सोहेल आसेफअली सय्यद व तौफिक शाह साबेर शाह (२४, रा. हळदी गल्ली) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफिक शाह व सोपान तुकाराम कोकाटे (रा. भिलहाटी वस्ती) यांच्यात जुन्या बसस्थानक परिसरातील एका हॉटेलचे चहाचे बील देण्यावरुन वाद झाला होता. याचा राग धरत सोपान कोकाटे व त्याच्या साथीदारांनी तालेब शाह व सोहेल आसेफ यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगडाने मारुन गंभीर जखमी केले. तसेच तौफिक शाह यासही दगडाने मारहाण करुन जखमी केले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी, उप अधिक्षक नागरे, पोलिस निरीक्षक रेंगे, संजय लोहकरे, एपीआय नरवडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जमावावर नियंत्रण मिळवले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी तौफिक शाह यांच्या तक्रारीवरुन सोपान कोकाटे, कृष्णा मोरे, अमोल सोनवणे, पवन गांगुर्डे, मानव अहिरे, शाम पवळ, शंकर सोनवणे, गोकुळ यांच्यासह दहा जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लोहकरे करीत आहेत. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

माजी  नगराध्यक्ष साबेर खान यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटाची समजूत घातली. सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांनीही तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवून शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. त्यामुळे शहरात निर्माण झालेला तणाव निवळला. 

पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक

शहरात सद्या नौगाजी बाबा यांचा उरूस सुरू असून यानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी आहे. दरम्यान काल एकाच दिवशी मारहाणीच्या दोन-तीन घटना घडल्यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या उपस्थितीत आज शहरात शांतता कमिटीची बैठक पार पडली. सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी कुटुंबातील वरिष्ठांनीही तरुणांचे प्रबोधन करावे असे आवाहन औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी केले

या बैठकीस नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, बाळासाहेब संचेती, तहसीलदार राहुल गायकवाड, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ गायकवाड, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, तहसिलदार राहुल गायकवाड, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे ,प्रकाश बोथरा, हाजी अकीलसेठ, काझी हाफीजोद्दीन, सोमू सोमवंशी आदी उपस्थित होते.