जागतिक स्तरावरील फोटो स्पर्धेमध्ये बैजू पाटील यांना दुसरे पारितोषिक

वैजापूर,२३ डिसेंबर / प्रतिनिधी :-प्रसिद्ध वाइल्डलाइफ फोटोग्राफर बैजू पाटील यांच्या जीम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये काढलेल्या हत्तीच्या डस्टबाथच्या फोटोला जागतिक दर्जाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. जागतिक स्तरावरील क्रोमॅटिक २०२२ पोलंड सेंट्रल युरोप यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत १९६ देशातील फोटाग्राफर सहभागी झाले होते. एक लाखांपेक्षा अधिक फोटोत अमेरिकेच्या फोटोग्राफरपाठोपाठ बैजू पाटील यांच्या फोटोने दुसरा क्रमांक मिळवला. तर चीन तिसऱ्या क्रमांकारावर राहिला.


बैजू यांनी जीम कार्बे नॅशनल पार्कमध्ये हत्तींच्या डस्टबाथचा हा फोटो घेतला आहे. यात हत्ती स्वतःच्या अंगावर माती टाकत असल्याचे दिसते. हत्तीच्या शरीरावर बसणाऱ्या जीवजंतूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी दररोज सकाळ-सायंकाळ पाण्यात अंघोळ झाल्यानंतर हत्ती ठराविक वेळेला शरीरावर मातीची उधळण करतात.

आठ दिवसानंतर मिळाला परफेक्ट क्लिक :
जीम कार्बेट हत्तीच्या डस्टबाथचा क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी बैजू पाटील यांना सतत आठ दिवस त्या भागात जावे लागले. हा क्षण टिपत असताना समोरून दोन कोल्हे जात होते. यातील एका कोल्ह्याने त्याच्या तोंडात शिकार पकडलेली दिसते. हा फोटो गोल्डन अवर्समध्ये काढल्यामुळे सूर्याची सोनेरी किरणे बॅकग्राऊंडला दिसत आहेत. पहाटेची किरणे आणि कोल्ह्यांचा अंडरएक्स्पोज फोटो यामुळे फोटोला कलात्मकता आली आहे. जगभरात या फोटोला नावाजले जात असून सर्वत्र कौतुक होत आहे.

अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार
वाइल्डलाइफ फोटोग्राफीत बैजू पाटील यांचे नाव जगभरात गेलेले आहे. त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळाली आहेत. यावर्षीदेखील त्यांना तीन पुरस्कार जाहीर झालेले आहेत. ग्लोबल फोटो काँटेस्ट, अमेरिका, मिलव्हस फोटो काँस्टेस्ट, रोमानिया आणि एनडी फोटोग्राफी अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. रॉयल अल्बर्ट हॉल, लंडन यांच्यातर्फे बैजू पाटील यांचे मलेशिया येथे ‘सेव्ह टायगर’ या नावाने प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. जगातील दहा उत्कृष्ट फोटाेग्राफरमध्ये बैजू यांचे नावही यादीत आहे. या कार्यामुळे भारताचे नाव पूर्ण जगभरात पोहोचणार आहे. दरम्यान, जागतिक पुरस्कार स्वीकारण्यासाठी लवकरच बैजू पाटील हे परदेशात जाणार आहेत. मागील 25 ते 30 वर्षापासून ते वाइल्डलाइफ फोटाेग्राफीत काम करत आहेत. वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने विविध जनजागृती अभियानातही वेळोवेळी बैजू पाटील सहभाग घेत असतात.