फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून पळसवाडीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

खुलताबाद ,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- पळसवाडी येथील शेतकऱ्याने रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून स्वतःच्याच शेतात चिंचेच्या झाडाला दोर लावून आत्महत्या केली. दादासाहेब लक्ष्मण ठेंगडे वय ३८ वर्ष  असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

दादासाहेब ठेंगडे यांनी महेंद्रा फायनान्स कडून गृह कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते वेळेवर जात नसल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला होता. त्यामुळे फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी त्यांना वारवार वसुली संबंधी तगादा लावत होते. एकीकडे सतत दोन वर्षापासून अतिपावसामुळे हातची शेत पीक धोक्यात आली. त्यामुळे ठेंगडे कर्ज कसे फेडायचे हा विचार सतत करायचे. इतके पैसे मी कुठून भरू व घर खर्च कसा भागवू,  या विचाराने त्रस्त होऊन त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पंचनामा करतांना पोलिसांना त्यांच्या पँटच्या खिशात मृत्यूसमयी एक चिठ्ठी मिळाली.  त्याच्या पश्चात आईवडील ,पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.