मास्कसह कोरोनोच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींकडून महत्वाच्या सूचना

कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये

जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची पालकमंत्र्यांनी दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

नवी दिल्ली,२२ डिसेंबर /प्रतिनिधी :-मास्कसह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे. तसेच येणारे सण आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी राज्यांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यांमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

भारतात सध्यातरी परिस्थिती धोक्याची नाही. परंतु संभाव्य धोके ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी जिनोम सिक्वेन्सींग टेस्ट वाढवण्यात याव्यात, असे आदेश दिले. तसेच राज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर तयार ठेवावेत, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सर्व राज्यांच्या आरोग्य यंत्रणा अलर्टवर ठेवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत दिल्या. लसीकरणासह सतर्क राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगत पंतप्रधानांनी देशवासियांना सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. तसेच कोरोना नियमांसंदर्भात जनतेत पुन्हा जागरुकता आणावी अशा सूचना त्यांनी राज्यांना दिल्या.

भारतीयांना घाबरण्याचे कारण नाही – डॉ. रवी गोडसे

जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगासह भारतातही भीतीचे सावट आहे. मात्र कोरोनाच्या जगभरातील वाढत्या उद्रेकामुळे भारतीयांना घाबरण्याचे काही कारण नाही, असे डॉ. रवी गोडसे यांनी म्हटले. भारतात चीनप्रमाणे कोरोनाचा उद्रेक होणार नाही, असे मत रवी गोडसे यांनी व्यक्त केले.

नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी

जागतिक पातळीवर कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना भारतात आता कोरोना विषाणू विरोधातील नेझल लसीच्या वापराला लसींना मान्यता देणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीने आज परवानगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधातील तयारीचा आढावा घेत उच्चस्तरिय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर नेझल लसीला मान्यता देण्यात आली. कोरोना लसीचे इंजेक्शन घेण्याची इच्छा नसणाऱ्या लोकांसाठी नेझल लस हा मोठा दिलासा ठरणार आहे. नाकावाटे स्प्रेच्या स्वरुपात दिली जाणारी लस इंजेक्टेबल लसीपेक्षा चांगली व फायदेशीर मानली जात आहे.

राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नागपूर ,२२ डिसेंबर/ प्रतिनिधी :- जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन, पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रूग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले.  राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चाचण्या, ट्रॅकींग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही 

नागपूर : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला  नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केले.

मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या संसर्गाची तीव्रता ओमीक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात आतापर्यंत 95 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच येत्या सोमवारपासून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना नुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची ताप चाचणी करण्यात येईल.