कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची अभूतपूर्व कामगिरीनादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलण्याची मोहीम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाची चोख अंमलबजावणी
औरंगाबाद,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :-
कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वितरण रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते तात्काळ बदलण्याची मोहीम सध्या महावितरणकडून सुरू आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या ७१३८ पैकी ६५१६ रोहित्र केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत. तर गेल्या दोन दिवसांमध्ये नादुरुस्त झालेली केवळ ६२२ नादुरुस्त रोहित्रे बदलणे शिल्लक असून तीदेखील तात्काळ बदलण्यात येत आहेत. तर महावितरणकडे सद्यस्थितीत तब्बल ४ हजार १८ रोहित्रे बदलण्यासाठी अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहेत.
    राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी थकीत व चालू वीजबिलांपोटी खंडित करू नये तसेच नादुरुस्त झालेले वितरण रोहित्र सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तात्काळ बदलून द्यावे, असे आदेश दिले आहेत. त्याची चोख अंमलबजावणी महावितरणकडून सुरू आहे. यामध्ये राज्यभरात २९ नोव्हेंबरपूर्वी नादुरुस्त असलेली ६ हजार ९२ व त्यानंतर शनिवारपर्यंत (१७ डिसेंबर) नादुरुस्त झालेली ६ हजार ५१६ अशी एकूण १२ हजार ६०८ नादुरुस्त रोहित्रे महावितरणकडून युद्धपातळीवर बदलण्यात आली आहेत.
    कृषिपंपांना तीन फेजचा वीजपुरवठा करणारे महावितरणची  राज्यभरात एकूण ७ लाख ५४ हजार वितरण रोहित्रे आहेत. यापूर्वी विविध कारणांमुळे सुमारे ३ हजार ते ३ हजार ५०० रोहित्रे दररोज बदलणे शिल्लक राहत असल्याची परिस्थिती होती. तथापि, यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्याचे पाठबळ देण्यासाठी जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहित्र तात्काळ बदलून देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याप्रमाणे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कृती आराखड्याद्वारे सूक्ष्म नियोजन करून व बैठकीद्वारे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नादुरुस्त रोहित्र तात्काळ बदलण्याची सक्त सूचना केली. सोबतच महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी राज्यात दौरे करून सर्व परिमंडलांचा आढावा घेत नादुरुस्त रोहित्र बदलण्याची कार्यवाही वेगवान केली. परिणामी शनिवार (दि. १७)पर्यंत राज्यभरात मागील दोन दिवसांमध्ये बदलणे शिल्लक राहिलेल्या नादुरुस्त रोहित्रांची संख्या केवळ ६२२ असून ते देखील तात्काळ बदलण्याची कार्यवाही सुरू आहे.  
    नादुरुस्त किंवा जळालेल्या वितरण रोहित्रांची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणने राज्यभरात १९३४ कंत्राटदार एजन्सीजची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत ११ हजार ६३२ रोहित्रे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे रोहित्रांच्या दुरुस्तीचा वेगदेखील प्रचंड वाढला आहे. नादुरुस्त झालेले रोहित्र बदलण्यासाठी महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे ऑईलसह तब्बल ४ हजार १८ रोहित्रे सद्यस्थितीत अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी रोहित्र नादुरुस्त झाले असेल त्यासंबंधीची माहिती शेतकरी बांधवांनी संबंधित कार्यालयात किंवा चोवीस तास सुरू असलेल्या १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.