वैजापूर तालुक्यात 24 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान ; निवडणूक प्रचार थंडावला

वैजापूर,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचे १६९ सदस्य व सरपंच निवडण्यासाठी शनिवारी मतदान होत असुन या निवडणुकीत १८ हजार ४८ पुरुष व १६ हजार ९२ स्त्री असे ३४ हजार १३९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ७९ व सदस्य पदांच्या १६९ जागांसाठी ३८२ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारणाचा कणा समजली जाणारी हि निवडणुक अतिशय चुरशीची होणार आहे.‌

या निवडणुकीसाठी प्रशासनाने ७४ मतदान केंद्रांवर प्रत्येकी एक याप्रमाणे ७४ केंद्राध्यक्ष व प्रत्येकी तीन मतदान अधिकारी याप्रमाणे २२२ मतदान अधिकाऱ्यांची नेमणुक केली आहे. याशिवाय आठ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. क्षेत्रीय आठ व मतदान केंद्रावर ४४ वाहनांच्या माध्यमातुन सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे निवडणुक विभागाने सांगितले. मतदान प्रक्रिया सुरळितपणे व शांततेत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोटेगाव व बेलगाव येथील मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. विरगाव पोलिस ठाण्यांतर्गत अव्वलगाव/हमरापूर, बाबतरा, डाग पिंपळगाव, नादी, महालगाव, नांदुरढोक/बाभुळगाव गंगा, हनुमंतगाव, माळीघोगरगाव, पानवी/वक्ती, पुरणगाव, वांजरगाव, कनकसागज ही केंद्रे संवेदनशील असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिंगणे कन्नड, हिलालपूर/कोरडगाव, कविटखेडा/बिरोळा, पारळा व कोल्ही ही केंद्रे संवेदनशील असुन खरज/तित्तरखेडा व टुणकी/दसकुली ही केंद्रे अतिसंवेदनशील आहेत.