धीस इज वन ऑफ द बेस्ट क्वारंटाईन सेंटर ऑफ महाराष्ट्र अलगीकरण केंद्रातील 62 वर्षीय सदगृहस्थांनी व्यक्त केल्या भावना

जालना: शहरातील एसआरपीएफ जवानांसाठी उभारण्यात आलेल्या नवीन निवासस्थानाच्या ईमारतीमध्ये असलेल्या अलगीकरण केंद्रामध्ये असलेले 62 वर्षाचे सदगृहस्थ म्हणतात, मी या अलगीकरण केंद्रामध्ये १५ जुलैपासुन राहत आहे. माझ्या मुलाच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे माझे येथे अलगीकरण करण्यात आले आहे. धीस इज वन ऑफ द बेस्ट क्वारंटाईन सेंटर ऑफ महाराष्ट्र अशा शब्दात भावना व्यक्त करत प्रशासनाने अत्यंत चोखपणे नियोजन करत या ठिकाणी कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना विषाणुने संपुर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. शासन व प्रशासनामार्फत कोरोना विषाणुचा समुळ नायनाट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यातसुद्धा कोरोना विषाणुला हरवण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाने तसेच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असुन जनतेला आरोग्याच्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या अथवा लक्षणे असणाऱ्या व्यक्तींसाठी संपुर्ण जिल्ह्यात अलगीकरण केंद्रांची स्थापणा करण्यात आली असुन जालना शहरामध्ये असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या निवासस्थानामध्ये अलगीकरण केलेल्या व्यक्तींची अत्यंत निटनेटकेपणाने काळजी घेण्यात येत असल्याचे दिसुन आले.

पुढे 62 वर्षाचे सदगृहस्थ म्हणतात, या ठिकाणी काम करत असलेल्या प्रत्येकासाठी मी अनोळखी आहे. परंतू कुटूंबातल्या एका सदस्याप्रमाणे येथे काम करत असलेल्या व्यक्ती हे आमची काळजी घेत आहेत. आम्हाला काय हवे, काय नको या सर्व बाबी एका कुटूंबातल्या सदस्याप्रमाणे विचारत आहेत. जेवण, चहा, नास्ता यासह आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा येथे पुरविण्यात येत आहेत. केवळ शासकीय कर्तव्य म्हणून हे लोक येथे काम करत नसुन समाजाप्रती आपलेही काही देणे लागते या भावनेतुन येथील प्रत्येकजण काम करत आहे. या ठिकाणी अलगीकरण करण्यात आलेल्या प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घेण्यात येत असुन दिवसामधुन दोन वेळेस ऑक्सीमीटरच्या माध्यमातुन पीएसओ२ लेव्हल तसेच थर्मल गनच्या माध्यमातुन ताप आहे किंवा नाही या बाबतची तपासणी करण्यात येत आहे. मी ठीक झाल्यास प्रशासनाने परवानगी दिल्यास या ठिकाणच्या लोकांची सेवा करण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

एसआरपीएफच्या दोन बिल्डिंगमधील चार विंगेमध्ये 360 व्यक्तींच्या अलगीकरणाची व्यवस्था

जालना शहरातील मंठा चौफुलीजवळ राज्य राखीव दलाच्या जवानांसाठी उभारण्यात आलेल्या निवासस्थानाच्या ईमारतीमध्ये 360 व्यक्तींचे अलगीकरण करता येईल अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी ए,बी,सी व डी या पद्धतीने विंग असुन या ठिकाणच्या प्रत्येक फ्लॅटला क्रमांक देण्यात आले आहेत. एका फ्लॅटमध्ये सहा व्यक्ती सामाजिक अंतराचे पालन करुन राहु शकतील अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी स्वतंत्र गादी, उशी, बेडशीट, पंखा, बाथरुम, आंघोळीसाठी पाणी आदी व्यवस्था करण्यात आली असुन आतापर्यंत या ठिकाणाहुन 238 व्यक्तींना लक्षणे नसल्याने डिस्चार्ज देण्यात असुन ए विंगमध्ये 41, बी-28 व डी विंगमध्ये 29 अशा एकुण 98 व्यक्तीं सध्या अलगीकरणामध्ये आहेत.

सात अधिकारी व कर्मचारी ठेवत आहेत चोख व्यवस्था

या अलगीकरण केंद्रामध्ये प्रत्येक व्यक्तीची चोख व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी 7 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असुन जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता राजु बाळुरकर हे या ठिकाणचे नोडल अधिकारी आहेत. अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच येथे व्यक्ती दाखल होताच त्यांना दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेल्या वस्तुची किट देण्यात येते. यामध्ये तेलाची बॉटल, कंगवा, आरसा, ब्रश, टुथपेस्ट, साबण, मेणबत्ती, माचिस, पायदान, टॉवेल, आंघोळीसाठी बकेट व मग, सॅनिटायजर, मास्क आदी वस्तुंचा समावेश आहे. तसेच त्यांना आवश्यक असलेल्या सर्व वस्तु वेळेत पुरवण्यात येत असुन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण टीमवर्कने काम करत असल्याचे नोडल अधिकारी श्री बाळुरकर यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक खोल्यांची दैनंदिन स्वच्छता अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींच्या खोल्यांची दैनंदिन स्वच्छता करण्यात येत असुन स्वच्छतेसाठी सात कर्मचारी कार्यरत आहेत. दिवसामधुन दोन वेळेस सोडीयम हायपोक्लोराईड द्रव्याने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. नागरिकांना कचरा टाकण्यासाठी प्लास्टीक पिशव्या, डस्टबीन उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन या ठिकाणी जमा झालेल्या कचरा घंटागाडीच्या माध्यमातुन नियमितपणे उचलण्यात येतो आहे.

डॉक्टरांसह 8 व्यक्तींची टीम घेतेय नागरिकांच्या आरोग्याची काळजी

अलगीकरण केंद्रामध्ये असलेल्या व्यक्तींच्या आरोग्याची दैनंदित तपासणी तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थच्या डॉक्टरांचा समावेश असलेल्या दोन टीम अहोरात्र मेहनत घेत आहेत. या केंद्रामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती जाणुन घेण्याबरोबरच दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीला ऱ्हदयरोग, मधुमेह, श्वसनाचा त्रास वा ईतर काही आजार आहेत का याची नोंद घेण्यात येते. व्यक्तीच्या संपर्कानुसार त्यांची लोरिस्क व हायरिस्क वर्गवारी ठरविण्यात येते. येथील प्रत्येक व्यक्तींची दिवसामधुन दोन वेळेस ऑक्सीमीटरद्वारे एसपीओटु तसेच थर्मल गनद्वारे तापेची तपासणी करण्यात येते. अलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तींचे पाच दिवस पुर्ण होताच त्यांचा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी पाठविण्यात येतो. नऊ दिवसामध्ये काही लक्षणे आढळुन न आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येत असुन नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी 24×7 डॉक्टर व परिचारिका मेहनत घेत असल्याची माहिती डॉ. अनिल पोकळे यांनी दिली.

अलगीकरणातील व्यक्तींच्या जेवणाची व पाण्याची उत्तम व्यवस्था

अलगीकरण केंद्रातील व्यक्तींच्या आरोग्याच्या काळजीबरोबरच त्यांच्या जेवणाचीही उत्तम व्यवस्था करण्यात येत आहे. येथील व्यक्तींना दररोज सकाळी 7-00 वाजता चहा, दुध व बिस्कीटे देण्यात येत असुन सकाळी 9-00 वाजता नास्त्यामध्ये पोहे, उपमा, मटकी यासारखे पदार्थ देण्यात येतात. दुपारी 1-00 वाजता पोळी, भाजी, वरण व भात असा पौष्टीक आहार देण्यात येत असुन जेवण गरम रहावे यासाठी सिलिकॉन रॅपरचा वापर करण्यात येतो. तसेच सायंकाळी 4-00 वाजता चहा व रात्री 7-00 व जेवण पुरविण्यात येते. तसेच प्रत्येक व्यक्तीला जारचे तसेच मागणीनुसार गरम पाणी दररोज पुरविण्यात येत आहे. अलगीकरण केंद्रामध्ये देण्यात येणारे जेवण, चहा व नास्ता यांचा दर्जा अत्यंत चांगल्या पद्धतीचा असुन घरगुती जेवणासारखे जेवण या ठिकाणी प्रशासनामार्फत आम्हाला उपलब्ध करुन देण्यात येत असुन येथे अलगीकरण केलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याची भावना जालना शहरातील संभाजीनगर येथे राहत असलेल्या सदगृहस्थांनी व्यक्त केली.

एकुणच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्याची गरज आहे. कोरोनाला आपल्या जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्याची गरज असुन विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरु नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अथवा एकाच ठिकाणी गर्दी करु नये. ताप, सर्दी, खोकला अशी काही लक्षणे असल्यास तात्काळ नजिकच्या दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *