वैजापूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर

माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर व त्यांचे समर्थक शिबिराकडे फिरकलेही नाही

वैजापूर, १२ डिसेंबर / प्रतिनिधी :-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर रविवारी वैजापूर येथे आयोजित करण्यात आले होते. 

विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरास माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव  गायकवाड, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील, ज्येष्ठ  नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज ठोंबरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष छायाताई जंगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, आ.सतीश चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, ज्येष्ठ  नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.पक्ष संघटन बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी जेष्ठ मंडळींचा सत्कार करण्यात आला तसेच पक्षाचे कार्यकर्ते रझा खान व त्यांचे सहकारी यांनी तयार केलेल्या 2023 च्या आदर्श दिनदर्शिकेचे प्रकाशन ही यावेळी करण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील

कार्यक्रमास दत्तू पाटील, बाळासाहेब भोसले, राजेंद्र कराळे, एल.  एम.पवार, सुरज नाना पवार, बाळासाहेब शेळके, विजय पवार, गणेश चव्हाण, संजय पवार, आर. व्ही. पाटील,  आनंद निकम, राहुल बागुल, दिगंबर मोरे, अमृत शिंदे, राहुल कुंदे, विनायक गाढे, संदिप मोटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर व त्यांचे समर्थक शिबिराकडे फिरकलेही नाही

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील ठोंबरे  व त्यांचे पुतणे माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराकडे तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर व त्यांचे समर्थक फिरकले सुध्दा नाही..

ठोंबरे यांच्या पक्ष प्रवेशाला माजी आमदार  भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा विरोध असतानाही पक्षश्रेष्टींनी ठोंबरे काका- पुतण्याला पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे चिकटगावकर व त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे ठोंबरे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे चिकटगावकर व त्यांच्या समर्थकांनी टाळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.